शेतकरी बांधवांनो नमस्कार. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) च्या फेब्रुवारी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील कापूस उत्पादन 9 लाख गाठींनी घटणार आहे. तर उत्तर विभागातील हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील कापूस उत्पादन 7.77 लाख गाठींनी घटना आहे. येथील कापूस उत्पादन 42.50 लाख गाठी होईल. मात्र राजस्थान मधील कापूस उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
मध्य भारतातील राज्यांमध्ये कापूस उत्पादन 21.70 लाख गाठींनी वाढणार असून एकूण कापूस उत्पादन 193 लाख गाठी होईल, असा अंदाज आहे. सीएआयच्या अहवालानुसार, दक्षिण भारतातील कापूस उत्पादन 5.50 लाख गाठींनी घटून एकूण कापूस उत्पादन 79.50 लाख गाठी होईल.
तसेच महाराष्ट्रातील कापूस उत्पादन 2.50 लाख गाठींनी घटेल, तर कर्नाटकातील कापूस उत्पादन 1 लाख गाठींनी घटणार आहे. आंध्रप्रदेशात सुद्धा कापूस उत्पादन 1.50 लाख गाठींनी, तर तेलंगणामध्ये 3 लाख गाठींनी कापूस उत्पादन घटणार आहे. मध्यप्रदेशमध्ये सुद्धा 1 लाख गाठींनी कापूस उत्पादन घटणार आहे.
ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीमध्ये एकूण 153.39 लाख गाठींचा कापूस पुरवठा झालेला असून, त्यामध्ये 115.70 लाख गाठींचे नवीन उत्पादन आणि 5.80 लाख कापूस गाठींची आयात तर ओपनिंग स्टॉक 31.89 लाख गाठींचा समावेश आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 या चार महिन्यांच्या कालावधीत 92.50 लाख गाठींचा वापर झाला. तर याच कालावधीत 4 लाख कापूस गाठींची भारतातून निर्यात करण्यात आली.
कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण कापूस पुरवठा 365.39 लाख गाठी पर्यंत जाईल, ज्यामध्ये ओपनिंग स्टॉक 31.89 लाख गाठींचा समावेश असेल, अंदाजे 12 लाख गाठींची आयात आणि चालू एकूण कापूस उत्पादन 321.50 लाख गाठी यांचाही समावेश आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास, यावर्षी कापूस उत्पादनात 9 लाख गाठींची तूट निर्माण होईल.
एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केल्यास, जागतिक पातळीवर आणि देशांतर्गत बाजारात सुद्धा कापूस उत्पादन घटल्यामुळे, पुढील काळात कापूस दर सुधारतील, असे मत कापूस अभ्यासक व्यक्त करीत आहेत.
Source:- uttamsheti