खानदेशात दादर ज्वारीला ३३०० ते ४४०० रुपये दर

खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे.

खानदेशात वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीला (Dadar Jowar) प्रतिक्विंटल ३३०० ते ४४०० रुपये दर (Jowar Rate) मिळत आहे. बाजारात आवक स्थिर आहे.

ऑक्टोबरच्या अखेरीस खानदेशात कोरडवाहू (Dry Land) क्षेत्रात येणाऱ्या दादर ज्वारीची पेरणी (Jowar Sowing) करण्यात आली होती. तापी, गिरणा, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत दादर ज्वारीचे कोरडवाहू पीक रब्बीमध्ये घेतले जाते.

पाऊसमान चांगले होते. यामुळे पेरणी सुमारे ३२ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यात ही पेरणी सुमारे २५ हजार हेक्टरवर झाली होती. तर धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील तळोदा, नवापूर, नंदुरबार तालुक्यांत कोरडवाहू दादर ज्वारीचे पीक जोमात होते.

वेळेत पेरणी झालेल्या कोरडवाहू दादर ज्वारीचे उत्पादन हाती आले आहे. यात एकरी सात ते आठ क्विंटल असे उत्पादन आले आहे. काही शेतकऱ्यांनी विद्यापीठांकडून संशोधित वाणांच्या ज्वारीची पेरणी केली होती. या पिकास एकदा सिंचन करण्यात आले. या क्षेत्रातील उत्पादन एकरी १२ ते १४ क्विंटल एवढे येत आहे.

परंतु संकरित, संशोधित वाणांच्या दादर ज्वारीचे दर कोरडवाहू क्षेत्रातील पारंपरिक वाणांच्या दादर ज्वारीपेक्षा क्विंटलमागे एक हजार रुपयांनी कमी आहेत. कोरडवाहू क्षेत्रातील बारीक आकारातील दादर ज्वारीचे दर प्रतिक्विंटल ४४०० रुपये आहेत.

तर संशोधित वाणांच्या दादर ज्वारीचे दर ३३०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. या ज्वारीची उंची १५ फुटांपर्यंत, तर दाणेही टपोरे, शुभ्र आहेत.

जळगाव, चोपडा, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा) व नंदुरबार बाजार समितीत दादर ज्वारीची आवक होत आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या रोज मिळून १५०० क्विंटल दादर ज्वारीची आवक विविध प्रमुख बाजारांत होत आहे. लिलावही लवकर होत आहेत. लवकर लिलाव व सचोटी यामुळे अमळनेर येथील बाजारास शेतकरी पसंती देत आहेत.

चोपडा येथेही आवक बऱ्यापैकी आहे. तसेच जळगाव बाजार समितीतही सध्या रोज ३०० ते ३५० क्विंटल दादर ज्वारीची आवक होत आहे. यंदाचे दर मागील हंगामाच्या तुलनेत अधिक आहेत. मागील हंगामात ३००० ते ३४०० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. यंदा किमान दर ३३०० रुपये, असे आहेत. उत्पादन दर्जेदार आहे. यामुळे उठावही आहे.

source-agrowon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *