![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/11/harbara.webp)
हरभरा पिकाच्या प्राथमिक अवस्थेत मर , खोडकुज व मुळकुज अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणातील बदल, वारंवार एकच एक पिक घेणे ,बीज प्रक्रिया न करणे अशा अनेक कारणामुळे तो वाढत चाललेला आहे.
परिणामी रोपांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाणे द्वारे जमिनीतून होतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास या रोगाचे प्रादुर्भाव रोखणे शक्य होते.
लक्षणे
मर रोग
हा रोगफ्युजारिअम ऑक्झीस्पोरम सायसेरी बुरशीमुळे होतो. पाने पिवळी पडून कोमेजतात . शेंडा मलूल होतो. झाड हिरवे असतानाच वाळते . मर रोग पिकाच्या रोप अवस्थेत व पीक प्रौढ अवस्थेत म्हणजे (सहा आठवडे च्या अवस्थेनंतर) असताना दिसून येतो.
अ) रोपावस्थेतील मर :
रोप अवस्थेतील पिकांमध्ये मर रोग पेरणीनंतर तीन आठवड्यात दिसून येतो . तीन ते पाच आठवड्यातील अवस्थेतील पीक कोलमडते. जमिनीवर आडवे पडते . या अवस्थेमध्ये रोप हिरवेच असते असे रोप उपटले असता जमिनीवरील व जमिनीखालील खोडाचा भाग बारीक झालेला आढळून येतो. परंतु खोड कुजलेले नसते . रोप उभे चिरले असता आतील उती काळपट तांबूस दिसतात . अशी रोपे काही दिवसातच वाळतात.
ब) प्रौढावस्थेतील मर :
पीक साधारण सहा आठवड्यांचे झाल्यानंतर दिसून येते. झाड शेंड्याकडून मलूल होऊन सुकते. झाडांची खालील पाने पिवळी पडतात. काही पाने मात्र हिरवीच असतात . दोन ते तीन दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडू लागतात.ही पिवळी झालेली पाने पीक परिपक्व अवस्थेपर्यंतही झाडांवर सुकलेल्या अवस्थेत दिसतात. रोगग्रस्त झाड उपटले की झाड वाळलेल्या अवस्थेत दिसते. झाड उभे चिरले असता उतीमध्ये काळपट भाग दिसतो. कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात. झाड वाढल्यानंतरही बुरशी उर्वरित अवशेषांमध्ये वास्तव्य करते.
मुळकुज
हा रोग राझोक्टोनिया सोलानी किंवा राझोक्टोनिया बटाटीकोला या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशीमुळे होतो. ज्या जमिनीमध्ये जास्त ओलावा असेल किंवा पाणी देऊन पेरला आहे. अशा शेतात (विशेषतः काळी, भारी जमिनीमध्ये) हा रोग जास्त आढळतो . परंतु ओलिताच्या हरभऱ्यात हा रोग प्रौढ अवस्थेतही दिसतो.जमिनीलगत मुळे कुचतात असे झाड सहजासहजी उपटून येत असते . राझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे कोरडा मूळकुज रोग होतो. यामध्ये संपूर्ण झाड वाळते. वाळलेले झाड विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण शेतात दिसतात. या रोगांमध्ये टोकावरील पाने व देठ कोमेजतात . मुख्य मुळावर कुजलेल्यापणा दिसतो. या रोगात मुळे कोरडी राहतात. मेलेले मुळे ठिसूळ होतात तर मुळांवरील साल अलगद निघून येते. झाड उभे चिरले असता अतिरिक्त धागेधागे झाल्यासारखे लक्षणे दिसतात. रोग साधारण 30 अंश सेल्सिअसच्या वर तापमान आल्यावर आढळतो.
नियंत्रणाचे उपाय
रोगग्रस्त शेतात हरभरा पीक तीन ते चार वर्ष घेण्याचे टाळणे, तसेच पिकाची फेरपालट करावी, रोगप्रतिकारक जाती उदा. विजय, जाकी ९२१८, पीडीकेव्ही कांचन (ओलिताखाली), पीडीकेव्ही कनक, पीडीकेव्ही काबुली २, पीडीकेव्ही काबुली ४ इ. वाणांचा पेरणीकरिता वापर करावा. जमिनीचा प्रकार व वाणाची अन्य वैशिष्ट्ये लक्षात घेणे गरजेचे आहे. गरज वाटल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.
पेरणीपूर्वी बियाण्यास टेब्युकोनॅझोल (५.४ टक्के एफ. एस.) बुरशीनाशक ४ मि.लि. किंवा प्रोक्लोराझ (५.७ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१.४ टक्के ई.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ३ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१५ टक्के) अधिक झायनेब (५७ टक्के डब्ल्यू. डी. जी.) (संयुक्त बुरशीनाशक) ४० मि.लि. प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रकिया करावी. त्यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बीजप्रकिया करावी.जास्त प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात कोड मार्ग एकरी दोन किलो या प्रमाणात 200 किलो असलेल्या शेण खतात मिसळून घ्यावा.