खरीप हंगामाच्या पेरण्या राज्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत. जवळपास १ कोटी ३८ लाख हेक्टरवर पेरण्या राज्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत पश्चिम घाटावरील भात लागवड बाकी आहेत. राज्यातील संपूर्ण लागवडी येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये पूर्ण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. तर १ ऑगस्टपासून १५ सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणीला सुरूवात झाली आहे.
सातबाऱ्यावर शेतातील पिकांचा पेरा ऑनलाईन पद्धतीने नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाची ठरते. तसेच ई पीक पाहणी केली नाही तर शेतकऱ्यांना पीककर्जापासून व पीकविमा याचा लाभ मिळणार नाही . त्यामुळे शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे .
दरम्यान, केंद्र सरकारने डिजीटल क्रॉप सर्वे सुरू केला आहे. याद्वारे ई पीक पाहणीतून समोर येणारी माहिती अधिक अचूक येते . यावर्षी महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील ३४ तालुक्यांमध्ये हा प्रकल्प पायलट मोडवर राबवला जाणार आहे . तर उर्वरित तालुक्यांत दरवर्षीप्रमाणे ई पीक पाहणी करण्यात येणार आहे .
● पंचेचाळीस दिवस पाहणी..
१ ऑगस्टपासून ४५ दिवस ई-पीक पाहणी सुरू राहील. ई-पीक पाहणी १५ सप्टेंबरला समाप्त होईल. मुदतवाढ मिळाली नाही तर तलाठी किंवा सहाय्यक स्तरावरील ई-पीक पाहणी १६ सप्टेंबर पासून सुरू होईल. तलाठी पातळीवरील ई पीक पाहणी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू ठेवतील.
गुगल प्ले स्टोअर वरून ई पीक पाहणी (डीसीएस) ॲप डाऊनलोड करू शकता .एकापेक्षा जास्त खाते क्रमांक एकाच महसुली गावात असल्यास सर्व भूमापन गट नंबर मोबाईल स्क्रीनवर नोंदणीसाठी देण्यात येतात .
● यंदापासून डिजिटल क्रॉप सर्व्हे
डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) पद्धत केंद्राने या वर्षीच्या खरीपापासून सुरु केली आहे. तसेच ई-पीक पाहणी राज्यस्तरीय पद्धत राज्य शासनानही स्वतंत्रपणे राबवित आहे. राज्य शासनाच्या जुन्या पद्धतीनुसार सर्व तालुक्यांमध्ये ई-पीक पाहणी होणार आहे. तसेच दोन्ही पद्धतीच्या ई-पीक पाहणीसाठी वापरले जाणारे अप एकच आहे.
● अशी करता नोंद
– शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी DCS अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून घ्यावे.
– विभाग निवडून मोबाईल क्रमांक टाकावा.
– गाव ,विभाग, जिल्हा, तालुका, निवडावा .
– विचारलेली माहिती भरावी व क्लिक करावे.
– शेतकऱ्याचे नाव,, गट क्र, पिकाचे नाव आणि पिकांचा फोटो इत्यादी माहिती भरावी.
परंतु तालुक्यांमध्ये यावर्षी डिजीटल क्रॉप सर्वे केला जाणार आहे अशा तालुक्यांमध्ये पीक पाहणी करण्यासाठी सदर गटाच्या हद्दीत जाणे आवश्यक आहे.