वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी उपयुक्त जिवाणू , संप्रेरके, अन्नद्रव्ये, गांडूळखतामध्ये असतात . गांडूळखताच्या वापरामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. खालील लेखात आपण गांडूळखत कसे बनवायचे आणि त्याचे फायदे पाहणार आहोत.
साहित्य ः
१) व्हर्मी बेड (12 फूट x 4फूट x 2फूट आकारमान)
२) झाडांचा पालापाचोळा व पीक अवशेष .
३) शेणखत, पाणी, सेंद्रिय पदार्थ कुजविणारे जिवाणू,
निर्मिती तंत्र :-
१) सर्वात पहिल्यांदा व्हर्मी बेड सपाट जमिनीवर व्यवस्थित बसवून घ्यावा. साधारणपणे चार फुटांचे १४ ते १६ बांबूचे तुकडे व्हर्मी बेड व्यवस्थित बसण्यासाठी आवश्यक असतात .
२) पहिला थर:- व्हर्मी बेडच्या तळाशी सर्वात अगोदर वाळलेल्या पानांचा, किंवा पीक अवशेषचा ६ ते ८ इंचांचा थर द्यावा
३) दुसरा थर :- त्यानंतर या थरावर पालापाचोळा , अर्धवट कुजलेले शेणखत ,किंवा कंपोस्टचा थर द्यावा.
४) तिसरा थर :- दुसरा थर दिल्यानंतर तिसरा थराला ४० किलो शेण घेऊन ते १०० लिटर पाण्यात मिसळून घ्यावे , यामध्येच एक टन पीक अवशेष/ पालापाचोळा कुजविण्यासाठी एक किलो कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळावे. हे सर्व मिश्रण एकसारख्या प्रमाणात तयार केलेल्या थरावर शिंपडावे.
५) ६ ते ८ इंचांचा पीक अवशेष/ पालापाचोळ्याचा थर पुन्हा या तिसऱ्या थरावर द्यावा. यावर परत कंपोस्ट खत , शेणखत किंवा अर्धवट कुजलेले शेण यांचा थर द्यावा. त्यानंतर कुजविणारे जिवाणू संवर्धकाच्या मिश्रणाचा त्यावर थर द्यावा.
६) व्हर्मी बेडमध्ये साधरणतः ६०% पाणी राहील याची दक्षता घ्यावी. वरील कृती सांगितल्या प्रमाणे पूर्ण व्हर्मी बेड भरून घ्यावा. यानंतर त्यामध्ये २ किलो गांडुळे सोडावीत. तुमच्याकडे गांडुळांची संख्या जास्त असेल तर तुम्ही तीन-चार किलोसुद्धा सोडू शकता यामुळे गांडूळखत लवकर तयार होण्यास मदत होते.
गांडूळ खताचे फायदे
– जमिनीची उत्पादन क्षमता वाढते.
– पीकवाढीसाठी आवश्यक , जमिनीची सुपीकता टिकून राहते.
– जमिनीत हवा व पाणी खेळते राहते, जमीन भुसभुशीत राहते त्यामुळे पिकांची जोमाने वाढ होण्यास मदत होते .
– जलधारण क्षमता वाढते. पाण्याचा योग्य तो निचरा होण्यास मदत होते .
– पिकाच्या निरोगी पध्दतीने वाढ झाल्यामुळे रासायनिक खताची आवश्यकता नसते त्यामुळे खर्चही कमी होतो .
– गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीतील उपयुक्त अशा जिवाणूंच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ होते .
– गांडुळे जमिनीतील खालच्या थराची माती वर आणतात, व मातीला उत्तम प्रतीची बनवितात.
– ह्युमसचे प्रमाण गांडूळ खतामध्ये भरपूर असते त्यामुळे नत्र, पालाश , स्फुरद इ पिकांना लगेच उपलब्ध होते .