जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने हा निर्णय घेतला असून बुधवारी (ता. १२) समितीचे सचिव विलास देसाई यांनी त्यासंबंधीचे आदेश पारीत केले. ऊस, द्राक्ष, डाळींब उत्पादकांसह सर्वच छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने तयार केलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडे गेला होता. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या सचिवांनी त्यासंबंधीचे आदेश काढले. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरवात झाली असून या वर्षांत शेतकऱ्यांना वाढीव पीककर्ज मिळणार आहे. त्यात हापूस व केशर आंबा, मिरची, टरबूज, कलिंगड, फुलशेती, शेवगा, वांगी, ड्रॅगनफ्रूट, ज्वारी, बाजरी, भुईमूग, तूर, कापूस, मका, गहु, हरभरा, ऊस, द्राक्ष, डाळींब, चिकू, पपई, पडवळ, कारले, भाजीपाला, हळद व कांदा अशा पिकांचा समावेश आहे.
विशेष बाब म्हणजे बाजरी (हेक्टरी २३ हजार १०० रुपये), भुईमूग (३४ हजार रुपये), तूर (३६ हजार ८०० रुपये), कापूस (४९ हजार रुपये) व मका (२९ हजार ७०० रुपये) या जिरायतील पिकांनाही बॅंकांकडून पीककर्ज मिळणार आहे.
तसेच एक गाय असलेल्यांना ३५ हजार रुपये तर म्हैस असल्यास ३७ हजार आणि शेळीमेंढी (दहा शेळ्या, एक बोकड असावे) पालन व्यवस्थापनासाठी एक लाख १० हजार रुपये, कुक्कुटपालन व्यवस्थापनासाठी (किमान १०० कोंबड्यांची मर्यादा) २७ ते ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय बॅंका करतील, असेही आदेशात नमूद आहे. पण, बॅंकांनी अडेवेडे न घेतागरज पाहून निकषांनुसार कर्जवाटप करावे, ‘सिबिल’ स्कोअरची सक्ती करू नये, एवढी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
पीकनिहाय हेक्टरी कर्ज मर्यादा
पीक कर्जाची मर्यादा
ऊस १,२६,०००
द्राक्ष ३,०५,८००
डाळींब १,५८,४००
ड्रॅगनफ्रूट २,२०,०००
आंबा १,५०,०००
हळद १,१५,५००
मिरची ८८०००
पपई ८४,७००
कांदा ७१,५००
शेतकऱ्यांनो, नक्की मागा एवढे पीककर्ज
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार आता खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांकडून वाढीव पीककर्ज मिळणार आहे. बॅंकेत गेल्यावर काहीवेळा शेतकऱ्यांना कोणत्या पिकांसाठी हेक्टरी किती पीककर्ज मिळते, हे माहिती नसते.
पण, नवीन निर्णयाप्रमाणे हेक्टरी टरबूज-कलिंगडसाठी ५५ हजार, फुलशेतीला ३५ ते ५१ हजार ७०० रुपये, शेवग्यासाठी ३३ हजार रुपये, वांग्यासाठी ५१ हजार ७०० रुपये पीककर्ज मिळेल. तसेच गव्हाला हेक्टरी ३६ हजार ३०० रुपये, उसाला आडसाली असल्यास हेक्टरी एक लाख २६ हजार ५००, पूर्वहंगामी व सुरू उसाला एक लाख २१ हजार रुपयांचे पीककर्ज दिले जाणार आहे. चिकूसाठी ७७ हजार, पडवळे-कारल्यासाठी हेक्टरी ३३ ते ३८ हजार रुपये, भाजीपाल्यासाठी हेक्टरी सहा हजार ६०० रुपयांचे कर्ज मिळेल.
source:- esakal