कांदा अनुदान अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत (ता.२०) आहे. अर्जासाठी बाजार समित्यांमध्ये गर्दी वाढली आहे.
कांदा अनुदान (Onion Subsidy) अर्ज भरण्याची शेवटची मुदत गुरुवारपर्यंत (ता.२०) आहे. अर्जासाठी बाजार समित्यांमध्ये गर्दी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सर्व सोयी सुविधा पुरवाव्यात, असे आदेश पणन संचालक विनायक कोकरे यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.
कांद्याचे दर घसरल्याने अडचणीत आलेल्या राज्यातील कांदा उत्पादकांना (२०२२ – २०२३) या वर्षात विक्री केलेल्या कांद्याला अनुदान जाहीर केले आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये, खासगी बाजारात, थेट पणन अनुज्ञप्ती धारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये व अधिकाधिक २०० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिशेतकरी असे अनुदान मंजूर केले आहे.
अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी गुरुवारी (ता.२०) शेवटची मुदत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये गर्दी वाढत आहे. या गर्दीवर नियंत्रणाबरोबरच शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी, टेबल खुर्च्यांची व्यवस्था करण्याचे आदेश कोकरे यांनी बाजार समित्यांना दिले आहेत.
…ही कागदपत्रे जोडावीत
– कांदा विक्रीची मुळ हिशोबपट्टी
– कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा
– बँक पास बुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
– आधार कार्डची झेरॉक्स प्रत
…हे प्रतिज्ञापत्र जोडावे
‘‘ज्या प्रकरणात ७/१२ उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे, अशा प्रकरणामध्ये सहमती असणारे शपथ पत्र आवश्यक राहील. संबंधित अर्ज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला त्या बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुखांकडे सादर करावेत,’’ असे आवाहन कोकरे यांनी केले.
source:- agrowon