लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले नवीन वाण विकसित केले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण क्षमताही काही जास्त दिवस नसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आला होता. एकूणच काय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अक्षरशः वांदा झालेला असतांना एक आनंदाची आणि दिलासादायक बाब समोर आली आहे. उन्हाळ कांद्याच्या प्रमाणे टिकवण क्षमता आणि दिसायला लाल कांद्यासारखं नवं कांद्याचे वाण बाजारात दाखल होणार आहे.
लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले लाल कांद्यामध्ये नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.
हेक्टरी 380 ते 400 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हे वाण आहे. एन एच आर डी एफ फुरसुंगी असे या लाल कांद्याच्या वाणाला नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरच हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.
हे वाण 110 ते 120 दिवसात काढणीला येते. उन्हाळ कांद्याप्रमाणे पाच ते सात महिने टिकवण क्षमता असलेले हे नवीन वाण आहे. वजन देखील चांगले असल्याने हेक्टरी 380 ते 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव या नवीन कांद्याच्या पिकावर कमी प्रमाणात होतो. शिवाय हा कांदा साठवणूक केल्यानंतर काळपट पडण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे लाल कलर असल्याने बाजारात देखील मागणी अधिक असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.
एन एच आर डी एफ फुरसुंगी या वाणाचे शेतकऱ्यांसाठी 15 ऑगस्ट पासून बियाणे उपलब्ध होणार आहे. यामध्ये या नवीन वाणाचे बियाणे नाशिक जिल्ह्यातील चितेगांव, लासलगाव आणि सिन्नर येथील केंद्रांवर मिळणार आहे.
कांद्यावर नेहमीच वेगवेगळे संशोधन करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चितेगाव येथील राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्र (N H R D F ) च्या वतीने रब्बीसाठी लाल कांद्यामध्ये संशोधन करत नवीन वाण विकसित केले आहे.
लाल कलर असल्याने बाजार मागणी देणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजी टेक्निकल अधिकारी मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या वाणाच्या किंमतीबद्दल स्पष्टता विक्रीच्याव वेळेसच होणार आहे.
source:- tv9marathi