स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, 100 टक्के अनुदान मिळणार, महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन…

शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी२४.कॉम या संकेतस्थळावर आपले मनःपूर्वक हार्दिक स्वागत. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड करून राज्य आणि राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाराष्ट्र राज्यात 2018-19 पासून सुरू करण्यात आली आहे. मधल्या कालावधीत ही योजना प्रलंबित ठेवण्यात आली होती.

मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर पुन्हा या योजनेला कार्यान्वित करण्याचे ठरविण्यात आले. या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे लाभार्थी फळबाग लागवड करून या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांना स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आला.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्यावर्षी 30 % आणि तिसऱ्या वर्षी 20% अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र आणि जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील 886 शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज सादर केले होते.  यामध्ये अनुसूचित जातीचे 122 शेतकरी, अनुसूचित जमातीचे 36 शेतकरी आणि सर्वसाधारण गटातील 728 शेतकरी यांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले होते.

यापैकी 113 अनुसूचित जाती, 33 अनुसूचित जमाती आणि 672 शेतकरी सर्वसाधारण गटातील, असे मिळून एकूण 818 शेतकऱ्यांना निवडण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र निवड झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपली सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत, असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविशंकर चलवदे यांनी केले आहे.
 
source – uttamsheti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *