गारपिटीमुळे पिकाचं नुकसान झालंय? अशी करा ऑनलाईन पद्धतीने विमा तक्रार..

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.कांदा, द्राक्ष बागा आणि उसाची उभे पीक झोपले असून भाजीपाला पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे.

द्राक्ष बागांचा पाला पूर्णपणे पडला असून मनी भरण्याच्या कालावधीत अवकाळीने झटका दिल्यामुळे रब्बी हंगामही वाया गेला आहे . अनेक शेतकऱ्यांनी आपण लागवड केलेल्या पिकांचा आणि फळ फळपिकांचा विमा काढला असेल तर गारपिटीमुळे आणि   अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने विम्याची  तक्रार करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी जर ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली नाही तर भरपाई मिळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . ही तक्रार ऑनलाईन पद्धतीने कशी करायची या संदर्भातील माहिती सोप्या भाषेत आपण पाहूया.

महत्त्वाची टीप: ज्या शेतकऱ्यांनी संबंधित हंगामातील पिकाचा विमा भरला आहे, केवळ त्याच  शेतकऱ्यांना विमा तक्रार करता येणार आहे याची नोंद घ्यावी.

विमा तक्रार ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्यात.

◼️ आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) नावाचे अॅप डाऊनलोड करणे

◼️ भाषा निवडणे (आपल्याला जी भाषा योग्य वाटेल ती निवडावी)

◼️चार पर्यायांपैकी तीन नंबरचा पर्याय ‘नोंदणी खात्याशिवाय खाते सुरू ठेवा’ हा पर्याय निवडावा

◼️त्यानंतर पाच प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतील.

◼️त्यातील ‘पीक नुकसान’ हा पर्याय निवडावा

◼️ त्यानंतर पीक नुकसानीची पूर्वसूचना आणि पीक नुकसान सद्यस्थिती असे दोन पर्याय येतील

◼️त्यातील ‘पीक नुकसानीची पूर्वसूचना’ हा पर्याय निवडावा

◼️मोबाईल नंबर टाका (जो मोबाईल नंबर पीक विमा भरताना दिलेला असेल तोच नंबर टाकणे)

◼️ओटीपी आल्यावर ओटीपी टाकून सबमिट करा

◼️ त्यानंतर हंगाम, वर्ष, योजना, राज्य अशी माहिती भरा

‘◼️नोंदणीचा स्रोत’ या रकान्यामध्ये आपण विम्याचा फॉर्म कुठून भरला त्याची माहिती भरणे आवश्यक आहे. (उदा.  सीएससी सेंटर, ऑनलाईन मोबाईलवरून वैगरे)

◼️विमा फॉर्मवरील पॉलिसी क्रमांक टाकणे

◼️त्यानंतर आपल्याला विम्याची संपूर्ण माहिती दिसेल

◼️ आपण विम्यामध्ये दाखल केलेल्या पैकी कोणत्या पिकाचे नुकसान झाले आहे ते निवडावे

◼️निवडल्यानंतर फोनवरील लोकेशनचे अॅक्सेस अॅपला देणे

◼️त्यानंतर तपशीलामध्ये घटनेचा प्रकार, घटनेचा दिनांक, घटनेच्या वेळेस पिक वाढीचा टप्पा, नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी, फोटो, व्हिडिओ अशी माहिती टाकायची आहे. 

◼️ ‘सादर करा’ या बटणावर क्लिक करा

◼️त्यानंतर तुम्हाला Docket ID नंबर येईल तो जपून ठेवा. या नंबरवरून तुम्हाला तुमच्या तक्रारीचे स्टेटस चेक करता येते.

पीक नुकसानाची तक्रार प्रत्येक शेतकऱ्याने नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत करणे आवश्यक आहे.  अन्यथा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईमधून वगळण्यात येते. मोबाईल हाताळायला शेतकऱ्यांना जमत नसेल तर CSC केंद्र किंवा गावातील एखाद्या शिक्षित तरूणाकडून मदत घ्यावी. त्याचबरोबर नुकसानीची माहिती आपल्या गावातील तलाठ्याला सुद्धा देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *