मानकात बदल, दूधदराचे काय? शेतकऱ्यांना पडलाय प्रश्‍न?वाचा सविस्तर

३.५ फॅट व ८.५ एसएनएफऐवजी यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ  या नव्या मानकावर  शेतकऱ्यांकडील गायीचे दूध खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला असल्या तरी  दूधदराबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे . सध्या प्रति लिटर 34 रुपये दरासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.

राज्यात सध्या गाईच्या दूधदराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. तीन ते चार महिन्यांतच सुमारे दहा रुपये कमी दराने दूध खरेदी सुरू आहे.  दूध उत्पादकांना त्याचा मोठ्या आर्थिक फटका  बसत आहे.  दूधदरासाठी अकोले जिल्हा नगर दूधदरासाठी सात दिवस उपोषण झाले.  राज्यातील अनेक भागातही आंदोलने सुरू आहेत.  अशातच बुधवारी राज्य शासनाने दूध विक्री बाबतचे नवीन मानके जाहीर केले आहेत.

गाईच्या दुधात किमान 3.5 स्निग्धता (फॅट) व ८.५ एसएनएफ (इतर घनपदार्थ)  प्रमाणावर यापूर्वी दूध खरेदी होत असे.  शासनाने नव्याने जाहीर केलेल्या मानकांनुसार यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफनुसार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी होणार आहे. तसेच या मनका नुसारच दूध दरही ठरविण्यात येण्याची शक्यता आहे . मात्र या मानकानुसार गाईच्या दुधाला किती दर देणार हे मात्र निश्चित केलेले नाही .म्हशीच्या दुधांसाठी ६.० फॅट व ९.० एसएनएफ,शेळी-मेंढीच्या  दुधासाठी ३.५ फॅट व ९.० एसएनएफ ही पूर्वीचीच मानके जैसे-थे ठेवण्यात आले आहेत.

राज्य शासनाने दूध विक्री बाबत ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ बाबत जो आदेश काढला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल . मात्र आता या गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे.

मिलिंद नाईकवाडी दूध उत्पादक अकोले जिल्हा नगर

३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दर्जाचे दूध स्वीकारून भेसळ कमी होईल  व आपोआप दर वाढतील असे शासनाला वाटते . मात्र सध्या दुधाचे  दर वाढवण्याची स्थिती नाही त्यामुळे थेट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे . मात्र या निर्णयामुळे रिव्हर्स दराच्या  माध्यमातून होणारी लूट थांबेल, दूध संचालकांच्या मनमानीला आळा बसेल ,आता या मानकानुसार किती दर देणार हे शासनाने जाहीर करणे गरजेचे आहे.

– डॉ. अजित नवले, दूध व्यवसायाचे अभ्यासक व किसान सभेचे नेते
 
‘‘३.२ फॅट व ८.३ एसएनएफ या दर्जाचे गायीचे दूध स्वीकारणाचे केंद्र सरकारने आधीच सांगितलेले आहे. मात्र बाजारात राज्याबाहेरील दुधाच्या बरोबरीने विक्रीबाबत स्पर्धा करताना या दुधाची क्वालिटी कमी दर्जाची असेल. इतर ब्रॅण्डच्या बरोबरीने जायचे असेल तर ३.५ व ८.५ या दर्जाचे दूधच द्यावे लागेल. शिवाय सध्याची दुधाची परिस्थिती पाहता ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ या दर्जाच्या दुधाला ३.५ व ८.५ चा दर देण्याची परिस्थिती नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्यात सध्या दुधाची भेसळ नाही. भेसळीबाबत केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे.
– प्रकाश कुतवळ, सचीव, राज्य दूध व्यावसायिक संघटना
 
केंद्र सरकारने ठरवलेल्या धोरणानुसार गायीचे दूध ३.५ फॅट व ८.५ एसएनएफऐवजी ३.२ फॅट व ८.३ एसएनएफनुसार खरेदी करण्याचे आदेश आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. यामुळे दुधाची क्वालिटी सुधारण्यासाठी होणारी भेसळ थांबेल आणि खरे उत्पादन समोर येईल. राज्यात दूध व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय झाला आहे. मात्र दुर्दैवाने त्याकडे राज्यकर्त्यांनी फारसे गाभीर्याने याआधी पाहिले नाही. त्याचे परिणाम आज शेतकरी भोगत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल तर धोरणात्मक पावले उचलावी लागतील.
राजेश परजणे, अध्यक्ष, महानंद व नामदेवराव परजणे कोपरगाव सहकारी तालुका दूध उत्पादक संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *