३.५ फॅट व ८.५ एसएनएफऐवजी यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ या नव्या मानकावर शेतकऱ्यांकडील गायीचे दूध खरेदी केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार हा बदल करण्यात आला असल्या तरी दूधदराबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यात संभ्रम निर्माण झाला आहे . सध्या प्रति लिटर 34 रुपये दरासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत.
राज्यात सध्या गाईच्या दूधदराचा प्रश्न ऐरणीवर आहे. तीन ते चार महिन्यांतच सुमारे दहा रुपये कमी दराने दूध खरेदी सुरू आहे. दूध उत्पादकांना त्याचा मोठ्या आर्थिक फटका बसत आहे. दूधदरासाठी अकोले जिल्हा नगर दूधदरासाठी सात दिवस उपोषण झाले. राज्यातील अनेक भागातही आंदोलने सुरू आहेत. अशातच बुधवारी राज्य शासनाने दूध विक्री बाबतचे नवीन मानके जाहीर केले आहेत.
गाईच्या दुधात किमान 3.5 स्निग्धता (फॅट) व ८.५ एसएनएफ (इतर घनपदार्थ) प्रमाणावर यापूर्वी दूध खरेदी होत असे. शासनाने नव्याने जाहीर केलेल्या मानकांनुसार यापुढे ३.२ फॅट व ८.३ एसएनएफनुसार शेतकऱ्यांकडून दूध खरेदी होणार आहे. तसेच या मनका नुसारच दूध दरही ठरविण्यात येण्याची शक्यता आहे . मात्र या मानकानुसार गाईच्या दुधाला किती दर देणार हे मात्र निश्चित केलेले नाही .म्हशीच्या दुधांसाठी ६.० फॅट व ९.० एसएनएफ,शेळी-मेंढीच्या दुधासाठी ३.५ फॅट व ९.० एसएनएफ ही पूर्वीचीच मानके जैसे-थे ठेवण्यात आले आहेत.
राज्य शासनाने दूध विक्री बाबत ३.२ फॅट व ८.३ एसएनएफ बाबत जो आदेश काढला आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल . मात्र आता या गायीच्या दुधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर दर मिळाला पाहिजे.
मिलिंद नाईकवाडी दूध उत्पादक अकोले जिल्हा नगर
३.२ फॅट व ८.३ एसएनएफ दर्जाचे दूध स्वीकारून भेसळ कमी होईल व आपोआप दर वाढतील असे शासनाला वाटते . मात्र सध्या दुधाचे दर वाढवण्याची स्थिती नाही त्यामुळे थेट शेतकऱ्यांना अनुदान द्यावे . मात्र या निर्णयामुळे रिव्हर्स दराच्या माध्यमातून होणारी लूट थांबेल, दूध संचालकांच्या मनमानीला आळा बसेल ,आता या मानकानुसार किती दर देणार हे शासनाने जाहीर करणे गरजेचे आहे.