भाऊसाहेब फुडंकर योजनेअंतर्गत मिळणार फळबागांसाठी २१ कोटी अनुदान,लवकरच बँक खात्यात जमा होणार…

राज्यामध्ये चालू हंगामात फळबाग लागवड केलेल्या व अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच २१ कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप होईल, अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी दिली.

यावर्षी कृषी खात्याने किमान साठ हजार हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटपाची तयारी केली होती.मात्र दुष्काळसदृश स्थिती अनेक तालुक्यांमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन बागा लावण्यात हात आखडता घेतला.त्यामुळे , यावर्षी राज्यामध्ये नवीन फळबाग लागवड ४० हजार हेक्टरच्या पुढे गेलेली नाही. मागील वर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने लागवड घटली आहे. नवीन फळ बागांची लागवड केलेले शेतकरी अनुदानाची वाट बघत आहेत .

राज्य शासनाकडे कृषी आयुक्तालयाने अनुदानाची मागणी केली होती. फळबागांच्या लागवडी साठी शासनाने २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच सरकारकडे अगोदरची शिल्लक राहिलेली रक्कम व नवीन मिळालेली रक्कम यामधूनच थकित अनुदानाचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबागेसाठी अनुदान वाटले जाते. परंतु बहुभूधारक व ज्या शेतकऱ्यांकडे जॉबकार्ड नाही असे शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतील. राज्य शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळत असते .

परंतु गेल्या चार वर्षांत राजकीय कुरघोड्यांमध्ये फुंडकर योजनेला पाहिजे तेवढा निधी मिळाला नव्हता. . परंतु भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेला २०२३-२४ मध्ये चांगले दिवस आले आहेत . या योजनेतून किमान १०४ कोटी रुपयांचे अनुदान वाटण्यास प्रशासकीय मंजुरी देखील शासनाने दिलेली आहे. परंतु आता अनुदान भरपूर दिलेले असले तरी लागवड मात्र त्याप्रमाणात होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्य शासनाने सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांला “फुंडकर योजनेतून २० कोटी रुपये, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील फळबागधारकांना ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बॅंक खात्यात लवकरच निधीची रक्कम जमा होणार आहे. ” असे फलोत्पादन विभागातून सांगण्यात आले.

“राज्यामध्ये फळबाग लागवडीचा कालावधी आता संपत आल्यामुळे मार्च अखेरपर्यंत आणखीन नव्या बागा उभ्या राहण्याची शक्यता नाही. परंतु आधी झालेल्या बागांची लागवड व मशागत केलेल्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान वाटण्यात कोणतीही अडचण येणार नाही.”
– डॉ. कैलास मोते, कृषी संचालक, फलोत्पादन विभाग. 

Leave a Reply