कांदा उत्पादकांची दिशाभूल मते मिळवण्यासाठीचा डाव : घनवट..

कांदा निर्यात सुरू करणार असल्याची केंद्र सरकारने खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. कांदा उत्पादकांची मते मिळवण्यासाठीचा हा एक डाव आहे,’’ असे मत शेतकरी नेते अनिल घनवट यांनी व्यक्त केले आहे.

सरकारने दोन हजार टन पांढरा कांदा गुजरातमधून निर्यात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक नाराज झाले होते. म्हणूनच केंद्रसरकारने देशभरातून ९९ हजार १५० टन कांदा निर्यात करणार असल्याचे वृत्त ‘पीआयबी’ वर दिले होते. परंतु ही निर्यात नव्याने असेल की अगोदर सुरू असलेली निर्यात यामध्ये समाविष्ट आहे याची स्पष्टता नाही .

सध्या निवडणूक प्रचार कांदा पट्ट्यात सुरू होत आहे. मोदी सरकारने मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे खोटी माहिती प्रसारित केली आहे. कोणताही आदेश नवीन कांदा निर्यातीसाठी पारित केलेला नाही. कांदा उत्पादकांच्या कर्जाला व दुरवस्थेला ,गरिबीला,मोदी सरकारचे निर्णय जबाबदार आहेत, असे स्पष्ट मत घनवट यांनी मांडले आहे.

प्रत्यक्षात एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत विविध देशांना निर्यात मंजूर केलेल्या कांद्याची ही एकूण ९९ हजार १५० टन इतकी बेरीज आहे.प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडलेल्या भूमिकेत स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घनवट म्हणाले , कोणताही आदेश नवीन कांदा निर्यातीबाबत नाही. या निर्यातीसाठी टेंडर काढण्यात येते ,कांद्याची निर्यात नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (एनसीईएल) मार्फत केली जाते . शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी होत नाही.

२५ रुपये प्रतिकिलोने कांदा आखाती देशात पोहोचतो ..

मोठ्या प्रमाणात पांढरा कांदा गुजरातमधील काही कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवला होता, परंतु कांदा निर्यातबंदी होती. केंद्र सरकारामध्ये जवळचे संबंध असलेल्या काही व्यापाऱ्यांनी निर्यातीची परवानगी मिळवली व एकाच दिवसामध्ये पूर्ण कांदा बोटीवर चढवून कांदा पाठवण्यात आला, असा आरोपही केला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात कांद्याची तस्करी गुजरातमधल्या बंदरावरून सुरू असल्याचेही बोलले जात आहे. १५ रुपये किलोने खरेदी केलेला कांदा फार तर आखाती देशात २५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे पोहोचतो. तेथे कांद्याला ८० रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळत असतो त्यामुळे तस्करांची मोठी कमाई होत आहे, असे ही यावेळी घनवट यांनी सांगितले आहे.

नोटिफिकेशन क्र. दिनांक देश मंजूर कोटा(टन)
६३/२०२३…….१ मार्च…….बांगलादेश…….५००००
६५/२०२३…….१ मार्च…….युएई…….१४४००
६७/२०२३…….६ मार्च भूतान-बहारीन-माँरिशस…….४७५०
२/२०२४…….३ एप्रिल…….युएई…….१००००
७/२०२४…….१५ एप्रिल…….श्रीलंका-युएई…….२००००

Leave a Reply