Maharashtra Weather Update : उत्तर भारतातून उत्तर दिशेने येणारे थंड वारे राज्यात प्रवेशातांना दिड किमी. उंचीपर्यंत ताशी २५ ते ३० किमी वेगाने वाहणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यात मिसळून महाराष्ट्रात लोटले जात आहेत.
उत्तर भारतातील राज्ये म्हणजे जम्मू काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश उत्तराखंड तसेच सिक्कीम सारख्या समशितोष्ण कटिबंधातील अक्षवृत्तांदरम्यान परंतु उच्चं तपाम्बर पातळीतील म्हणजे समुद्र सपाटी पासून साडेबारा किमी. उंचीवरील सातत्याने टिकून असलेले सध्य:काळातील ताशी २७५ किमी. गतीने वाहणारे वेगवान पश्चिमी वाऱ्यांचे झोत(जेट स्ट्रीम), वायव्य आशियातून, आपल्याकडे सध्या उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी (झंजावात)प्रकोप या तिन्हीच्या एकत्रित परिणामामुळे महाराष्ट्रात वारा वहनातून, सध्या जाणवत असलेले थंडीचे सातत्य अजूनही पुढील पाच दिवस म्हणजे रविवार दि. १ डिसेंबर (मार्गशीर्ष अमावस्या)पर्यन्त असेच टिकून राहणार असून सध्य:स्थितीतील थंडीत कदाचित किंचित अधिक वाढही होवू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाचे सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
सध्याची कमाल व किमान तापमाने-
सध्या मुंबईसह कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान २८ तर पहाटेचे किमान तापमान १२ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने भागपरत्वे सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने खालावलेले आहेत.
त्यातही नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे लातूर नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ गोंदिया भंडारा नागपूर अकोला ह्या जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा १० ते १३ डिग्री सेंटीग्रेड पर्यन्त घसरला आहे.
मुंबईसह कोकणातील कमाल तापमान मात्र ३० तर किमान तापमान १४ डिग्री सेंटीग्रेड च्या आसपास आहे.
*चक्रीवादळ अथवा पाऊस*
कन्याकुमारीजवळील हवेच्या कमी दाबाचे चक्रीवादळात विकसनाची जरी शक्यता असली तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चक्रीवादळ वा पावसाची विशेष भीती बाळगू नये. कारण महाराष्ट्रावर त्याचा काहीही परिणाम जाणवणार नाही, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले आहे.












