Kanda Bajarbhav: आज दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात पुणे-पिंपरी बाजारात लोकल कांदयाला सरासरी ४१५० रुपयांचा प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. काल पुणे बाजारात ४७५०, तर पिंपरी बाजारात ४८५० भाव होता मात्र पिंपरी बाजारात आवक अवघी ४ क्विंटल इतकीच होती.
या आठवड्यात उन्हाळी कांद्याची नाशिक जिल्ह्यातील आवक नगण्य असून लाल आणि पोळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात यायला सुरूवात झाली आहे. रविवारी नाशिकसह अनेक भागातील कांदा लिलावांना सुटी असते. त्यामुळे सोमवारी कांदा लिलावांसाठी गर्दी होते. सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यात सुमारे १ लाख २६ हजार क्विंटल लाल कांदा, १६ हजार क्विंटल पोळ कांदा आणि केवळ ३ हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली. तर राज्यात एकूण सुमारे ३ लाख ३० हजार क्विंटल कांदा आवक झाली.
काल दिनांक १० डिसेंबर रोजी राज्यात सुमारे सव्वा दोन लाख क्विंटल आवक कांद्याची झाली असून एकट्या नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची ९१ हजार, तर पोळ कांद्याची १६ हजार आणि उन्हाळी कांद्याची अवघी १४०० क्विंटल आवक झाली. नगर जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची अवघी ८० क्विंटल आवक झाली असून उन्हाळी कांद्याचा साठा जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
असे आहेत बाजारभाव
सध्या लाल आणि पोळ कांद्याला नाशिकच्या मुख्य बाजारांत सुमारे ३६०० ते ३७०० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळताना दिसत आहेत. आवक वाढल्याने बाजारभावात घट झाल्याचे पाहायला मिळत असूनही सध्याचे बाजारभाव हे समाधान कारक आहेत. काल दिनांक १० डिसेंबर रोजी पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी ३७०० रुपये प्रति क्विंटल, तर लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी ३८०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहेत.












