मागील आठवड्यात कापसाला अकोला बाजारात सरासरी ७ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. सध्या बाजारात कापसाची आवक वाढताना दिसत आहे. तर प्रतवारीनुसार आणि धाग्याच्या प्रकारानुसार कापसाला सरासरी ७ हजार ते सव्वासात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळताना दिसत आहे.
आज दिनांक ११ डिसेंबर रोजी उमरेड बाजारात कापसाची ७०५ क्विंटल आवक होऊन कमीत कमी ७ हजार तर सरासरी ७ हजार ५० रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव होते.
काल दिनांक १० डिसेंबर रोजी हिंगणघाट बाजारात मध्यम धाग्याच्या कापसाची सुमारे ११ हजार क्विंटल आवक झाली. कालच्या दिवसातील ही राज्यातील सर्वाधिक आवक ठरली. या ठिकाणी कापसाला किमान ६ हजार ९०० तर सरासरी ७१०० रुपये बाजारभाव मिळाला. त्या खालोखाल बार्शी टाकळी येथे १० हजा क्विंटल मध्यम धागा कापूस आवक होऊन सरासरी ७४२१ रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला. वडवणी बाजारात सर्वात कमी म्हणजेच ६९२५ रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.
दरम्यान बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४-२५ च्या हंगामासाठी भारताचे कापूस उत्पादन ७.४% ने कमी होऊन ३०.२ दशलक्ष गाठी होण्याचा अंदाज आहे कारण लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे आणि अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे.
यू. एस. डी. ए. ने भारतातील उत्पादन अंदाज ३०.७२ दशलक्ष गाठीपर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे पुरवठ्यावरील ताण वाढला आहे. देशांतर्गत उत्पादनातील या घसरणीमुळे निर्यात कमी होईल आणि आयातीची गरज वाढेल अशी अपेक्षा आहे, जी मागील वर्षाच्या १.७५ दशलक्ष गाठीवरून २.५ दशलक्ष गाठीपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
अमेरिका आणि स्पेनमधील कपातीच्या तुलनेत चीन, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे (Source-USDA)












