Cotton cultivation : या राज्यात कापूस लागवडीला सुरूवात; बोंडअळी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स…

Cotton cultivation

Cotton cultivation : खरीपाच्या पावसानंतर जमिनीत ओलावा किंवा वाफसा तयार झाल्यानंतरच महाराष्ट्रात कापसाची लागवड सुरू होते. मात्र राजस्थानमध्ये कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली असून, यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने बीटी कापसाची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीने बीटी कापसावरही प्रभाव टाकला असून, त्याने या पिकावरील विषाणूंविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित केली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कीड नियंत्रणावर विशेष भर देण्यात येत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीपासून संरक्षण मिळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सर्वप्रथम २० टक्के क्षेत्रावर नॉन-बीटी कापसाची लागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे क्षेत्र ‘रेफ्युजी’ म्हणून ओळखले जाते. यामुळे अळीच्या संवेदनशील कीटकांचे संरक्षण होऊन प्रतिकारशक्ती विकसित होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय कापूस काढणीनंतर शेतातील अवशेष जाळणे किंवा खोल नांगरणी करणे आवश्यक आहे, कारण अळीच्या अंडी आणि लार्वा (बारीक अळ्या) पिकाच्या अवशेषांमध्ये लपून राहतात.

तसेच फेरोमोन सापळ्यांचा वापर करून अळीची उपस्थिती ओळखणे आणि कीटकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात व वेळेवर करणे या गोष्टींवरही भर देण्यात आला आहे. यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले असून प्रशिक्षणाद्वारेही जागरूकता वाढवली जात आहे. कीटकनाशकांचे सतत एकाच प्रकारचे वापर टाळून वेगवेगळ्या गटातील औषधांचा पर्यायी वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे अळीमध्ये औषधांविरोधात होणारी प्रतिकारशक्ती टाळता येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाही हे उपाय करता येणे शक्य आहे.

राज्य सरकारने बियाण्यांच्या वापराबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांनी शिफारस केलेल्या वाणांचाच वापर करावा आणि बाजारात सहज मिळणाऱ्या बोगस बियाण्यांपासून दूर राहावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. बोगस बियाण्यांमुळे पिकाचे उत्पादन घटते आणि अळीचा प्रादुर्भावही वाढतो. त्यामुळे अधिकृत स्रोतांतूनच बीटी व नॉन-बीटी बियाण्यांची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राजस्थान सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या उपाययोजना शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीपासून संरक्षण देण्यास मदत करतील आणि उत्पादनात सुधारणा घडवून आणतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांनी या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास यंदाचा कापसाचा हंगाम फायदेशीर ठरू शकतो.