
onion market rate : मागील दोन आठवड्यापासून राज्यात सुरू असलेला कांदा बाजारभाव वाढीचा ट्रेंड जून महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनही दिसून येत असून काही ठिकाणी कांदा बाजारभाव स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.
काल सोमवार दिनांक २ जून रोजी राज्यातील बाजारसमित्यांमध्ये एकूण सुमारे २ लाख ८७ हजार क्विंटल आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक टिकून आहे, किंबहुना मागच्या सोमवारपेक्षा या सोमवारी जास्त आवक झाली. मात्र तरीही दरामध्ये फारसा फरक पडलेला दिसून आलेला नाही.
नाशिक जिल्ह्यात जवळपास दीड लाख क्विंटल उन्हाळी कांदा आवक झाली, तर लाल कांदा आता केवळ सोलापुर बाजारात २२ हजार १२९ क्विंटल इतका विक्रीला आला आणि धुळे बाजारात केवळ १० क्विंटल लाल कांदा आला. नागपूर बाजारात पांढरा कांद्याची आवक २८०० क्विंटल झाली आणि भाव वाढत आहेत. सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटल पांढऱ्या कांद्याला मिळत आहेत. अहिल्यानगर बाजारात सुमारे ७० हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती आणि सरासरी दर १ हजार रुपयांच्या आसपास आहे.
दरम्यान काल पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याची सुमारे २६ हजार क्विंटल आवक झाली. उन्हाळी कांद्याल या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक कमाल दर मिळाला, म्हणजेच प्रति क्विंटल २५०१ रुपये. तर किमान ६०० आणि सरासरी १४५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. लासलगाव बाजारात किमान ५०० रुपये कमाल १९५१ आणि सरासरी १३५० रुपये दर उन्हाळी कांद्याला मिळाला. पुणे पिंपरी बाजारात सरासरी १४००, मोशी बाजारात सरासरी १ हजार रुपये, अहिल्यानगरमध्ये सरासरी १ हजार, लोणंदमध्ये सरासरी १ हजार, सोलापूर बाजारात सरासरी ९५० रुपये, सातारा बाजारात ११०० रुपये, विटा बाजारात १३५०, कोल्हापूर बाजारात १ हजार रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.