
Water storage in dams : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या सुरुवातीच्या पर्जन्यमानामुळे राज्यातील एकूण धरणसाठा २ जुलै २०२५ अखेर ४७.१३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यातील उपयुक्त साठा १९,०८८ दशलक्ष घनमीटर असून तो सुमारे ३५ हजार दशलक्ष घनमीटरच्या क्षमतेच्या तुलनेत नोंदवला गेला आहे. मागच्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा केवळ २१.८९ टक्के होता, म्हणजे यंदा त्यात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.
राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा ४९.०९ टक्के आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ४८.६६ टक्के आणि लघुप्रकल्पांमध्ये सुमारे ३६.११ टक्के साठा नोंदवला गेला आहे. ही आकडेवारी धरणातील उपयुक्त साठ्याची असून त्यामध्ये मृत साठा धरलेला नाही.
विभागनिहाय विचार केला असता, कोकण विभागात सर्वाधिक म्हणजे ५९.८४ टक्के पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात ५५.१८ टक्के. नाशिकमध्ये ४५.७५ टक्के, अमरावतीत ४३.७७ टक्के, संभाजीनगरमध्ये ३४.९६ टक्के आणि नागपूरमध्ये ३४.०९ टक्के साठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे संभाजीनगर विभागात गेल्या वर्षी याच दिवशी उपयुक्त साठा फक्त ९.४७ टक्के होता. यंदा तो ३५ टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याने मराठवाड्यातील पाणीटंचाईच्या संकटात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख धरणांपैकी उजनी धरणात ७१.६ टक्के उपयुक्त साठा असून, मागील वर्षी ते शून्यावर होते. गोसीखुर्द धरणात ५८१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे, जो २३.६९ टक्के आहे. काटेपूर्णा धरणात सध्या १९.७२ टक्के साठा आहे. पैठण (जायकवाडी) धरणात ९७१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी असून साठा ४४.७७ टक्के नोंदवला आहे, जो गेल्या वर्षी फक्त ४.४५ टक्के होता.
विष्णुपुरी धरणात ५३.२२ टक्के साठा आहे. माजलगाव धरणात मात्र साठा कमी असून तो केवळ ११.३४ टक्के आहे. नाशिक विभागातील भंडारदरा ६१.०५ टक्के, निळवंडे ५१.१४ टक्के, गंगापूर ५९.०१ टक्के, गिरणा ३५.५५ टक्के, तर दारणा ५३.६८ टक्के भरले आहे. कोल्हापूरमधील राधानगरी धरणात ६४.०५ टक्के पाणी आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला, पवना, पानशेत आणि नीरा देवघर या धरणांमध्ये अनुक्रमे ६३.७६, ५५.३०, ५०.६५ आणि १०.०२ टक्के साठा आहे. कोयना धरणात ५०.८३ टक्के पाणीसाठा असून, वारणा धरणात ६६.९८ टक्के पाणी शिल्लक आहे. वीर धरणात ७३.१८ टक्के साठा असून, तो सर्वाधिक समाधानकारक मानला जात आहे.