
Sowing area decreased : महाराष्ट्रात १ जून ते ७ जुलै २०२५ या कालावधीत २७९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या ९९.१ टक्के आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २९१.८ मिमी म्हणजे सरासरीच्या १०३.४ टक्के पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा हवामानात विभागनिहाय असमानता असून काही विभागांत समाधानकारक पर्जन्यमान, तर काही ठिकाणी उशिराने पावसाची हजेरी लागल्यामुळे खरीप पेरणीला विलंब झाला आहे.
पिकनिहाय बदल पाहता, मक्याचा पेरा वाढलेला असून, सोयाबीन, तूर, उडीद व कापूस यामध्ये घट झाली आहे. पावसाचे प्रमाण सरासरीइतके असले तरी वेळोवेळी खंड आणि विभागनिहाय असमानतेमुळे पेरणीवर विपरित परिणाम झाल्याचे या अहवालातून स्पष्ट होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही उशिरा पेरणी सुरू असून, पुढील आठवड्यातील पावसावर खरीप हंगामाचा यशस्वी प्रवास अवलंबून राहणार आहे.
राज्यात यंदा ७ जुलैपर्यंत एकूण १०७.९६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे सरासरीच्या ६९ टक्के आहे. यापैकी ऊसवगळता पेरणी क्षेत्र १०७.१५ लाख हेक्टर असून हे सरासरीच्या ७४ टक्के आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ऊसासह ७१ टक्के व ऊसवगळता ७७ टक्के होते. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात सुमारे ४ लाख हेक्टरने घट झाल्याचे दिसते.
यंदा ऊसाचे लागवडीचे क्षेत्र ०.८१ लाख हेक्टर इतके असून ते मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के कमी आहे. इतर प्रमुख पिकांमध्ये सोयाबीनचा पेरा ४०.६० लाख हेक्टरवर असून मागील वर्षाच्या तुलनेत त्यात ६ टक्क्यांची घट झाली आहे. कापसाचे क्षेत्र ३३.५९ लाख हेक्टर असून तेही मागील वर्षाच्या तुलनेत ९ टक्क्यांनी घटले आहे. दुसरीकडे, मक्याचे क्षेत्र ११.२३ लाख हेक्टर असून, यामध्ये ३३ टक्के वाढ झाली आहे. तृणधान्य गटातील बाजरी, ज्वारी, नाचणी यामध्ये पेरणी घसरली आहे. एकूण अन्नधान्याचा पेरा ३२ लाख हेक्टरवर आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत फक्त ६ टक्के वाढलेला आहे.
जिल्हानिहाय पाहता, सर्वाधिक पेरणीची नोंद ठाणे जिल्ह्यात झाली असून ती गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल ३२२ टक्के आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूरमध्ये १२० टक्के आणि रत्नागिरीमध्ये १६३ टक्के पेरणी झाली आहे. दुसरीकडे, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांत अनुक्रमे फक्त ४ आणि ५ टक्केच पेरणी झाली आहे. सातारा (५१%), कोल्हापूर (८०%) आणि नागपूर (८२%) याठिकाणीही पेरणी कमी झाली आहे.
विभागनिहाय विचार केला असता, कोकण विभागात २३ टक्के, नाशिक ७५ टक्के, पुणे ७८ टक्के, औरंगाबाद ८६ टक्के, लातूर ८५ टक्के, अमरावती ८१ टक्के आणि नागपूर विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ ४९ टक्के पेरणी झाली आहे.