Onion market : कांद्याच्या दरात अनिश्चितता आणि चाळीतील साठवणुकीची मर्यादा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, असा सल्ला कांदा उत्पादक संघटनांकडून देण्यात आला आहे. सध्या देशांतर्गत मागणी आणि निर्यातीमध्ये वाढ होत असून, कांद्याच्या दरवाढीचे संकेत आहेत. मात्र, चाळीत साठवलेला कांदा खराब होण्याची शक्यता वाढत असल्याने निर्णयात संतुलन आवश्यक आहे.
बांगलादेशसह श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, दुबई, कतार, यमन, व्हिएतनाम आणि मॉरिशस या देशांमध्ये भारतीय कांद्याची निर्यात सुरू झाली आहे. त्यामुळे दरवाढीची शक्यता असून, शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असा सल्ला देण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्यास दर घसरू शकतो, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
चाळीतील कांद्याची स्थितीही महत्त्वाची आहे. जर चाळीत ओलावा वाढलेला असेल, टरफले नरम झाली असतील, किंवा पत्र्याला वाफ दिसत असेल, तर कांदा खराब होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा स्थितीत कांदा विक्री करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. चाळीच्या वरच्या थरातील कांदा उकरून पाहिल्यास गरम वाफ जाणवत असेल, तर ती चाळ बसल्याची लक्षणं आहेत.
कांदा साठवून जवळपास पाच महिने झाले असून, पुढील सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये थंडी, पाऊस आणि उष्णता यामुळे कांदा कोम फेकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वजनात घट आणि दर्जा कमी होण्याचा धोका आहे. अशा वेळी चांगल्या दर्जाचा कांदा निवडून विक्रीसाठी पाठवावा, आणि खराब होण्याआधी योग्य निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे












