Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी निर्णायक मोर्चा आज मुंबईत धडकणार, सरकारसमोर मोठं आव्हान..

Maratha reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आज मुंबईत आझाद मैदानावर धडकणार आहे. राज्यभरातून हजारो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले असून, “चलो मुंबई”चा नारा गावोगावी दिला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आधीच गर्दी असताना, या मोर्चामुळे वाहतूक आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला होता की, २६ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा ठोस निर्णय न घेतल्यास २७ ऑगस्टला ते मोर्चासह मुंबईकडे रवाना होतील. त्यांनी अंतरवाली सराटी (जालना) येथून मोर्चा सुरू केला असून, दोन दिवसांच्या प्रवासानंतर आज रात्री आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यांच्या मार्गावर शिवनेरी, चाकण, लोणावळा, पनवेल, वाशी आणि चेंबूरसह अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून स्वागताची तयारी झाली आहे.

या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता, सरकारने पडद्याआड अनेक हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काही मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले असून, आरक्षणाच्या तात्पुरत्या उपायांवर चर्चा सुरू आहे. मात्र, जरांगे पाटलांनी कोणताही तडजोडीचा प्रस्ताव नाकारत “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही” अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारला मोठ्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

मुंबई पोलिसांनी आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाला गणेशोत्सवाच्या गर्दीबरोबरच मोर्चाच्या व्यवस्थापनाचेही आव्हान पेलावे लागणार आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा हा मोर्चा केवळ आंदोलन नसून, एक सामाजिक शक्तिप्रदर्शन ठरणार आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने पुन्हा एकदा सरकारसमोर आपली मागणी ठामपणे मांडली आहे. आजच्या मोर्चातून पुढील राजकीय आणि सामाजिक दिशा ठरण्याची शक्यता असून, राज्यातील वातावरण तापले आहे