
New price list : दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रसामग्रीवरील वस्तू व सेवा करात (GST) मोठी कपात जाहीर करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री आता अधिक स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.
या बैठकीत ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना (TMA), कृषी यंत्रसामग्री उत्पादक संघटना (AMMA), अखिल भारतीय एकत्रित उत्पादक संघटना (AICMA) तसेच भारतीय पॉवर टिलर संघटना (PTAI) यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष व आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि जीएसटी दर कपातीचे तपशील स्पष्ट केले. याआधी कृषी यंत्रसामग्रीवर १२% ते १८% GST आकारला जात होता, तो आता फक्त ५% करण्यात आला आहे. हा नवा दर २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू होणार आहे.
केंद्रीय मंत्री चौहान यांनी स्पष्ट केले की, या दरकपातीचा थेट लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व उत्पादक संघटनांना पारदर्शकतेचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, सीड ड्रिल, मल्चर, स्प्रे पंप, हार्वेस्टर यांसारख्या यंत्रांमध्ये हजारो रुपयांची बचत होणार आहे. उदाहरणार्थ, ₹10 लाख किंमतीच्या ट्रॅक्टरवर आता सुमारे ₹1 लाखांपर्यंतची GST कपात होईल, तर ₹50,000 किंमतीच्या रोटाव्हेटरवर ₹6,500 पर्यंतची बचत होईल.
शेतकऱ्यांसाठी ही दरकपात म्हणजे केवळ आर्थिक दिलासा नाही, तर यांत्रिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आधुनिक यंत्रसामग्री स्वस्त झाल्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागात शेती यंत्रसामग्रीच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोणती औजारे किती रुपयांनी स्वस्त होणार?
35 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त होईल.
45 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 45,000 रुपयांनी स्वस्त होईल.
50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयांनी स्वस्त होईल.
75 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 63,000 रुपयांनी स्वस्त होईल.
विद्युत तणनाशक यंत्र (7.5 अश्वशक्ती): ₹5,495 ने स्वस्त
मालवाहू वाहन ट्रेलर (5-टन क्षमता): ₹10,500 ने स्वस्त .
बी पेरणी आणि खत यंत्र (11 फाळ): ₹3,220 ने स्वस्त
बी पेरणी आणि खत यंत्र (13 फाळ): ₹4,375 ने स्वस्त
मळणी कापणी पट्टी यंत्र (14 फूट): ₹1,87,500 ने स्वस्त
पेंढा संकलक यंत्र (5 फूट): ₹21,875 ने स्वस्त
सुपर सीडर (8 फूट): ₹16,875 ने स्वस्त
हॅपी सीडर (10 फाळ): ₹10,625 ने स्वस्त
फिरता नांगर (6 फूट): ₹7,812 ने स्वस्त
चौकोनी गाठणी यंत्र (6 फूट): ₹93,750 ने स्वस्त
मल्चर (8 फूट): ₹11,562 ने स्वस्त
हवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र (4-रांगा): ₹32,812 ने स्वस्त
ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र (400-लिटर क्षमता): ₹9,375 ने स्वस्त.
छोटे ट्रॅक्टर्स आता अधिक परवडणारे होणार आहेत. चार रांगांचे भात लावणी यंत्र तब्बल ₹१५,००० रुपयांनी स्वस्त झाले असून, विविध पिकांसाठी वापरले जाणारे प्रती तास ४ टन क्षमतेचे मळणी यंत्र ₹१४,००० रुपयांनी कमी दरात उपलब्ध होणार आहे.
याशिवाय, १३ अश्वशक्तीच्या पॉवर टिलरची किंमत ₹११,८७५ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या दरकपातीमुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करणे अधिक सुलभ होणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, जीएसटी दर १८% वरून ५% पर्यंत कमी करण्यात आला असून, याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल.
शेतकऱ्यांमध्ये या लाभांविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी सरकार विविध माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर माहिती प्रसारित करणार आहे. यामुळे कस्टम हायरिंग सेंटर्सना (उपकरणे भाड्यावर देणारी केंद्र) कमी किमतीत यंत्रसामग्री मिळू शकेल. परिणामी, त्यांनीही शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात भाडे सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रब्बी हंगामासाठी ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’च्या दुसऱ्या टप्प्यात वस्तू आणि सेवा कर दर कपातीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. यामुळे शेतकरी आधुनिक शेतीसाठी योग्य निर्णय घेऊ शकतील. कृषी यांत्रिकीकरणाला बळकटी देण्यासाठी भविष्यातील योजनांमध्ये उत्पादक संघटनांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही चौहान यांनी स्पष्ट केले.
या बैठकीनंतर चौहान यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. नवीन दरांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कृषी क्षेत्राशी संबंधित उपकरणांच्या नवीन किमतीविषयी जाणून घेण्यासाठी https://static.pib.gov.in/WriteReadData/specificdocs/documents/2025/sep/doc2025919641201.pdf