Mka prices : मागील तीन वर्षांत मक्याला सरासरी दोन हजार रुपयांचा दर मिळत असला तरी यंदाची परिस्थिती अधिक आव्हानात्मक दिसते. वाढलेल्या उत्पादनामुळे बाजारात पुरवठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून दर घसरण्याची शक्यता अधिक स्पष्टपणे जाणवते. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतिम अग्रीम अंदाजानुसार २०२४-२५ मध्ये राज्यातील मक्याचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ८२.७३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्याचा थेट परिणाम नांदगाव बाजारातील डिसेंबर महिन्यातील किमतींवर होत आहे. यामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा दर आणखी कमी राहण्याची शेतकरीवर्गात चिंता निर्माण झाली आहे.
मागील तीन वर्षांच्या नोंदीवर नजर टाकल्यास डिसेंबर २०२२ मध्ये नांदगाव बाजारात मक्याचा दर २०१४ रुपये प्रति क्विंटल होता, तर डिसेंबर २०२३ मध्ये तो किंचित वाढून २०८७ रुपये झाला. यंदाच्या डिसेंबर २०२४ मध्येही जवळपास स्थिरच राहून दर २०८० रुपये मिळाला. मात्र, उत्पादनात झालेली मोठी वाढ आणि बाजारातील वाढलेला पुरवठा लक्षात घेता डिसेंबर २०२५ साठी दरात लक्षणीय घसरण होण्याची शक्यता असून, १६१० ते १९१५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळू शकतो, असे प्राथमिक अंदाज सूचित करतात.
देशभरात ऑक्टोबर २०२५ मध्ये मक्याची बाजारातील आवक मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ४१.४ टक्क्यांनी वाढल्याने पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचा दरावर थेट दबाव जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२५-२६ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २५०० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष व्यवहारातील वाढती आवक आणि बाजारातील मागणी-पुरवठा संतुलनामुळे किमतींमध्ये चढ-उतार अधिक प्रकर्षाने दिसून येत आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना बाजारपेठेतील हालचालींचा सतत आढावा घेण्याची गरज अधिक भासते.












