Rabi season : ‘जीवरेखा’ धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडले; शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित..

Rabi season : जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अकोला देव येथील ‘जीवरेखा’ धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कालव्यात पाणी उपलब्ध झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू पेरणीस सुरुवात केली असून, रब्बी हंगामाबाबत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने विहिरींमध्येही पुरेसे पाणी शिल्लक होते, त्यामुळे कालव्यातून पाणी मिळेल की नाही याबाबत संभ्रम होता; मात्र पाणी सुटताच शेती कामांना गती मिळाली आहे. तरीही डिसेंबरअखेर उशिराने पेरल्या जाणाऱ्या गव्हाच्या उत्पादनाबाबत काही प्रमाणात चिंता शेतकऱ्यांत व्यक्त होत आहे.

कालव्यातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता कायम असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशावादी वातावरण आहे. नियमानुसार कालव्यातून पाणी सोडण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत असल्याने, यावर्षी डिसेंबरमध्ये पहिले पाणी मिळाल्यामुळे फेब्रुवारीअखेरपर्यंत किमान दोन वेळा पाणी सोडले जाईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. या सकारात्मक चित्रामुळे गहू पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, यंदा रब्बी हंगामातील उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.