Cotton registration : कापूस नोंदणीसाठी फक्त सहा दिवस शिल्लक; ओटीपी अडचणींमुळे शेतकरी संकटात…

Cotton registration : कापूस नोंदणीसाठी अवघे सहा दिवस शिल्लक असताना ओटीपीसंबंधी तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत मोबाईलवर वेळेत ओटीपी न मिळणे, नेटवर्क समस्या, सर्व्हर व्यत्यय तसेच आधार-मोबाईल लिंकिंगमधील त्रुटी यांमुळे नोंदणी अपूर्ण राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना तांत्रिक साधनांची मर्यादा आणि मार्गदर्शनाचा अभाव जाणवत असून मुदतवाढ किंवा पर्यायी ऑफलाइन व्यवस्था करण्याची मागणी वाढत आहे. नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना हमीभाव, खरेदी प्रक्रिया व इतर लाभांपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे प्रशासनाने तातडीने तांत्रिक सुधारणा, हेल्पडेस्कची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांसाठी सुलभ उपाय उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या नोंदणीची अंतिम मुदत आता जवळ आली असून अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार हमी खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी १६ जानेवारीपर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे २५ हजार कापूस उत्पादक शेतकरी अद्यापही नोंदणीच्या प्रतीक्षेत असल्याने, येत्या काळात कापूस विक्री करताना त्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ‘कपास किसान’ अ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच कापूस विक्रीची परवानगी मिळते आणि त्यानंतर शेतकरी हमी खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जातात. मात्र प्रत्यक्ष विक्रीच्या वेळी ओटीपी न मिळणे, सर्व्हर डाऊन राहणे, अ‍ॅप उघडण्यात अडचणी येणे अशा विविध तांत्रिक समस्यांचा सामना अनेक शेतकऱ्यांना करावा लागत असून त्यामुळे विक्री प्रक्रिया खोळंबत आहे.

कापूस विक्रीच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी (One Time Password) पाठवला जातो आणि हा ओटीपी मिळाल्यानंतरच संपूर्ण माहिती अद्ययावत होऊन कापूस विक्रीची पावती तयार होते. मात्र हीच ओटीपी प्रक्रिया अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा अडसर ठरत आहे. नोंदणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक न देता मुलांचा, कुटुंबातील सदस्यांचा किंवा सीएससी केंद्रचालकांचा मोबाईल क्रमांक नोंदविल्यामुळे ओटीपी त्या क्रमांकावर जातो. याची कल्पना नसल्याने ओटीपी मिळवण्यात वेळ जातो, तर काही वेळा ओटीपीची वैधताही संपते आणि परिणामी कापूस विक्री प्रक्रिया रखडते.