Onion rate : कोणत्याही शेतमालाला समाधानकारक दर न मिळाल्याने बळीराजा सध्या गंभीर संकटात सापडला आहे. नवीन वर्षात तरी उत्पन्नात सुधारणा होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी लागवड केली होती; मात्र चांगल्या भावाच्या अपेक्षेने पिकवलेल्या लाल कांद्याच्या दरात गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये झालेल्या घसरणीने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे. वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता आणि दरातील चढउतार यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, भविष्यात तरी स्थिर आणि न्याय्य दर मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी नवीन आयात परवाने थांबवल्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील कांदा बाजारपेठांवर दिसून येत असून, लासलगाव कांदा बाजार समितीत अवघ्या दोन दिवसांत दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. गुरुवारी लासलगाव बाजारात १,२८२ वाहनांतून १९ हजार ९४८ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या कांद्याला किमान ७०० रुपये, कमाल २ हजार १०० रुपये, तर सरासरी १ हजार ६७५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता; मात्र शुक्रवारी १ हजार ५६ वाहनांतील कांद्याचा लिलाव झाला असता बाजारभाव थेट ६०० ते २ हजार ५१ रुपयांपर्यंत घसरले, ज्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपळगाव येथील शरदचंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. ८ व ९ जानेवारी या कालावधीत बाजारात होणारी कांद्याची आवक, प्रत व दर्जा तसेच मागणी-पुरवठ्याच्या स्थितीवर बाजारभाव अवलंबून राहिले. ८ जानेवारी रोजी कांद्याला कमाल २,०७५ रुपये, सरासरी १,४५० रुपये, तर किमान दर थेट २०० रुपयांपर्यंत घसरला. ९ जानेवारी रोजीही अशीच स्थिती राहिली असून, या दिवशी कमाल दर २,०२९ रुपये, सरासरी दर १,४५० रुपये आणि किमान दर ९०० रुपये नोंदविण्यात आला. सतत बदलणाऱ्या दरांमुळे उत्पादन खर्च तरी निघेल का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याच्या दरात मोठी तफावत दिसून येत असून, प्रत्येक बाजारातील आवक, दर्जा आणि मागणी-पुरवठ्यावर बाजारभाव अवलंबून आहेत. येवला बाजारात कांद्याला किमान २०० रुपये, कमाल १,६३६ रुपये तर सर्वसाधारण १,३५० रुपये दर मिळत आहे. लासलगाव मार्केटमध्ये किमान ७०० रुपये, कमाल २,१०० रुपये आणि सरासरी १,६७५ रुपये भाव नोंदविण्यात आला आहे. निफाड बाजारात किमान ६०० रुपये, कमाल १,७०५ रुपये तर सर्वसाधारण १,५५० रुपये दर आहे. अंदरसूल मार्केटमध्ये किमान २०० रुपये, कमाल १,६१८ रुपये आणि सरासरी १,४२५ रुपये दर मिळत असून, पिंपळगाव बाजारात किमान ९०० रुपये, कमाल २,०९९ रुपये आणि सर्वसाधारण १,४५० रुपये दर कायम आहे. या चढ-उतारांमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित व स्थिर दर मिळेल की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.












