धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाव लालसर-गुलाबी रंग असलेल्या, गोडवा जपणाऱ्या देशी गाजरामुळे विशेष प्रसिद्ध झाले आहे. गावातील शेतकरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या बियाण्याचा वारसा जतन करत आहेत. व्यापारी आणि ग्राहक यांच्याकडून याच गाजराला नेहमीच पहिली पसंती मिळते. कमी खर्चात हमखास चांगले उत्पादन देणाऱ्या या पिकामुळे भांडगावच्या शेतकऱ्यांचे अर्थकारण उंचावले असून, त्यांच्या शेतीला नवा आधार मिळाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील भांडगाव हे गाव गाजराच्या शेतीसाठी विशेष ओळखले जाते. सुमारे दोन हजार लोकसंख्या असलेले हे गाव जवळा–माणकेश्वर मार्गावर, बार्शीपासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. गावातील ४३६ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ४२२ हेक्टर क्षेत्र शेतीखाली असून, येथील शेतकरी ऊस, कांदा, तूर, ज्वारी यांसारखी पिके घेतात. मात्र रब्बी हंगामात गाजर हेच त्यांचे प्रमुख नगदी पीक ठरते.
गावातील शेतकऱ्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला देशी गाजर शेतीचा वारसा अत्यंत मेहनतीने जपला आहे. येथील शेतकरी सूरज किसन भोसले यांच्या म्हणण्यानुसार, गावात गाजर उत्पादकांची संख्या साधारण ५० ते ६० दरम्यान आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे क्षेत्र एक ते दोन एकरांच्या आसपास असून काहींचे क्षेत्र कमी-जास्त आहे. त्यामुळे गावातील सुमारे शंभर ते दीडशे एकर क्षेत्र गाजर पिकाखाली आहे.
काळ्या मातीतून उगवले गाजरांचे सोनं
कमी खर्चात हमखास उत्पन्न देणाऱ्या गाजर शेतीमुळे भांडगावातील शेतकरी आणि गावातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमातून सिंचनाची सोय उपलब्ध असून गावाजवळून नदीही वाहते. तरीही गाजर पिकाला एकदा पेरणी केल्यानंतर पुढील वाढीच्या टप्प्यात तुलनेने कमी पाणी लागते. शिवारातील खोल, कसदार काळी माती या पिकासाठी अत्यंत पोषक ठरली आहे. भांडगावसह शेजारील माणकेश्वर, जवळा आणि सिरसाव शिवारातील शेतकऱ्यांनीही या देशी गाजर शेतीचा यशस्वी अनुभव घेतला आहे.
मात्र शेजारील गावांतील गाजरात भांडगावएवढा गोडवा जाणवला नाही. गावातील सूरज भोसले हे पिढ्यानपिढ्या चालत आलेली गाजर शेती करतात. त्यांच्या शिवारात दरवर्षी सुमारे तीन एकरांत हे पीक घेतले जाते. ते सांगतात की, खरिपात सोयाबीन, उडीद यांसारखी पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात म्हणजे सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये गाजराची पेरणी केली जाते. हे पीक साधारण तीन महिन्यांचे असून ऑक्टोबरमधील शेवटच्या पावसाच्या पाण्यावर लागवड केलेली गाजरे डिसेंबर–जानेवारीत, संक्रांतीपूर्वीच बाजारात पोहोचतात.
सणासुदीच्या काळात गाजराला चांगला दर मिळतो. या पिकात रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर अत्यल्प प्रमाणात केला जातो. काही शेतकरी पाण्याची उपलब्धता पाहून डिसेंबर–जानेवारीत दुसरी लागवड करतात. मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला ही गाजरे काढणीस येतात. उन्हाळ्यात कीड लागण्याचा धोका असल्याने फारच कमी शेतकरी गाजराचे उन्हाळी पीक घेतात. सध्या पाच–सहा शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात उत्पादन घेतले असून दर किंचित कमी झाला असला तरी उन्हाळी गाजरालाही बाजारात मोठी मागणी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बियाण्यांची निर्मिती
गाजराचे बियाणे शेतकरी स्वतः शिवारातच तयार करतात. पिढ्यानपिढ्या आलेली बियाण्याची शुद्धता आणि गुणधर्म जपण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यामुळे दरवर्षी बाहेरून बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता भासत नाही. काही शेतकरी मोठ्या प्रमाणात बियाण्याचे उत्पादन करून ते इतर शेतकऱ्यांना विकतात. सुमारे दोन गुंठ्यांत ७० ते ८० किलोपर्यंत बियाणे तयार होते, असे सूरज भोसले सांगतात. पेरणीसाठी एकरी सुमारे २० किलो बियाण्यांची गरज भासते. दरवर्षी दहा ते पंधरा गुंठ्यांत शेतकरी बियाण्याचे उत्पादन घेतात. बियाणे तयार करण्यासाठी गाजर कापून कांद्यासारखी लागवड केली जाते.
व्यापारी व ग्राहकांची पहिली पसंती – भांडगावचे गाजर
गाजर पिकाला खुरपणी व अन्य देखभालीची फारशी आवश्यकता नसते. ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढणी केली तर गाजराचे शेंडे मोडून नुकसान होते. त्यामुळे लहान कुदळीने उकरून काढणी केली जाते. अशा पद्धतीने गाजराला कुठेही डंख लागत नाही आणि शेंडे व्यवस्थित राहतात. त्यामुळे गाजराची चमक टिकून राहते व दरही समाधानकारक मिळतो. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने किंवा गरज पडल्यास महिला मजुरांची मदत घेऊन काढणी केली जाते.
भोसले यांच्या अनुभवानुसार, एकरी साधारण १० ते १५ टन उत्पादन मिळते. भांडगावच्या देशी गाजराला विशिष्ट गोडी, चव आणि लालसर–गुलाबी रंग आहे. मोठ्या संख्येने ग्राहक खाण्यासाठी तसेच हलवा आदी पदार्थ तयार करण्यासाठी याच गाजराला प्राधान्य देतात. बार्शी, भूम, परांडा, वाशी आणि आसपासच्या गावांतील बाजारांमध्ये शेतकरी गाजराची विक्री करतात; मात्र मोठ्या प्रमाणात विक्री ही बार्शीच्या बाजारपेठेतच केली जाते. व्यापारीदेखील या गाजराला डोळे झाकून पहिले प्राधान्य देतात.
सेंद्रिय उत्पादनाला अलीकडे मोठे महत्त्व प्राप्त झाले असून त्या पद्धतीने पिकविलेल्या भांडगावच्या गाजराला विशेष मागणी आहे. गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने गावात डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण अत्यल्प असल्याचे शेतकरी भोसले सांगतात. वेगळ्या गुणवैशिष्ट्यांमुळेच भांडगावच्या गाजराला आता ‘जीआय’ निर्देशांकाची गरज असल्याचे शेतकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे.
शेतकरी अनुभव : गाजर शेतीचा मार्गदर्शक
गाजर उत्पादक सूरज भोसले सांगतात की, गाजराचे बियाणे पारंपरिक पद्धतीने शेतकरी स्वतः तयार करतात, त्यामुळे त्यावर कोणताही अतिरिक्त खर्च होत नाही. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळते. गाजराच्या उत्पन्नामुळे आमच्या कुटुंबाच्या अर्थकारणाला मोठा आधार मिळाला आहे. आम्ही टुमदार घर उभारले असून पाच ते सहा लाख रुपये खर्चून विहीरदेखील खोदली आहे.
गावातील गणेश शिवाजीराव भोसले सांगतात की, यंदा माझ्या शेतात दीड एकर गाजर होते. आमच्याकडे हे पीक कित्येक वर्षांपासून घेतले जाते, इतके की त्याची सुरुवात आमच्या वडिलांनाही ठाऊक नाही. भांडगावच्या गाजराचा गोडवा अप्रतिम असून त्याला मोठी मागणी आहे. यंदा सुरुवातीला दर किलोला ३० ते ३५ रुपये होता; मात्र सध्या दर कमी झाले आहेत. बार्शी, परंडा आणि भूम येथील बाजारांमध्ये या गाजराची विक्री केली जाते.












