Malegaon sugar factory election result 2025 : माळेगाव साखर कारखान्यात अजित पवार विजयी; मात्र अजूनही निकालाची प्रतिक्षा..

माळेगाव निवडणुक हायलाईटस्‌:
* अजित पवार यांनी ‘B’ गटात १०१ पैकी ९१ मतांनं स्पष्ट विजय मिळवला
* एकूण मतदानसंख्या १९,६५१ होती, त्यात A (ऊस उत्पादक) गटात १९,५४९ आणि B गटात १०२ मतदार होते
* मतदानात क्रॉस‑व्होटिंगची घटना झाली आहे, ज्याचा प्रभाव पुढच्या फेरीवर जाणवू शकतो
* सुरुवातीला PDCC बँकेच्या रात्री उशिरापर्यंत उघडण्याची घटना घडली होती; सुप्रिया सुळे यांनी SIT चौकशीची मागणी केली.

पुणे जिल्ह्यातील बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘पवार विरुद्ध पवार’ असा थेट सामना रंगला असून, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पाठिंब्याचा दावा करणारा ‘सहकार बचाव पॅनल’ आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘नीलकंठेश्वर पॅनल’ रिंगणात आहे. त्यामुळे ही निवडणूक फक्त कारखान्याच्या संचालक मंडळापुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

२४ जून रोजी सकाळपासून सुरू झालेली मतमोजणी अद्याप सुरू असून २५ जून रोजी सकाळपासून दुसऱ्या फेरीची मोजणी जोरात सुरू आहे. कारखान्याच्या २१ संचालक पदांपैकी १६ जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर चार जागांवर तावरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. एक जागा अत्यंत अटीतटीची बनली असून मतांची आकडेवारी थोड्या फरकाने बदलते आहे.

सांगवी गटामध्ये ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, याठिकाणी माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजीत खलाटे हे दोघेही आघाडीवर आहेत. हे दोघेही सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आहेत. दुसरीकडे, बारामती गटातून अजित पवार गटाचे देविदास गावडे आघाडीवर असून याच गटातून तावरे गटाचे जी. बी. गावडे यांनाही आघाडी मिळालेली आहे.

महिला प्रतिनिधी गटात, अजित पवार पॅनलच्या संगीता कोकरे यांनी आघाडी घेतली असून, तावरे गटाच्या राजश्री कोकरे यांनाही मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान पहाटे ब गटातून अजित पवार स्वत:ही निवडून आले आहेत.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचे झाले तर, माळेगाव कारखाना बारामती तालुक्यातील एक प्रतिष्ठेचा सहकारी उपक्रम मानला जातो. गेल्या अनेक दशकांपासून इथे शरद पवार गटाची छाप होती. मात्र गेल्या काही वर्षांत अजित पवार यांनी स्वतंत्र पकड निर्माण करत नेतृत्व केले. त्यामुळे यंदाची निवडणूक फक्त गटबाजीपुरती मर्यादित नसून ती एक प्रकारची राजकीय शक्तीमोजणी ठरली आहे.

अखेरचा निकाल दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता असून, कोणता पॅनल कारखान्यावर वर्चस्व मिळवतो हे ठरवणारा हा निकाल संपूर्ण राज्याच्या सहकार आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरणार आहे.

सध्या तरी आकडेवारीनुसार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनल स्पष्ट आघाडीवर आहे, मात्र अंतिम फेरीतील काही जागा निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे माळेगाव कारखान्याचा निकाल हा केवळ संचालक मंडळापुरता न राहता, पुढील स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.