बांगलादेश सरकारने नागपुरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये इतक्या टक्क्यांनी केली वाढ , निर्यातीचं गणित काय? जाणून घ्या सविस्तर ..

नागपुरी संत्र्यावरील आयात शुल्कामध्ये बांगलादेश सरकारने पाच वर्षांमध्ये ५०५ टक्के तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी ११४.७७ टक्क्यांनी वाढ केली आहे. यावर्षी बांगलादेशातील संत्रा निर्यात वाढत्या आयात शुल्कमुळे आणखी मंदावणार आहेत. दुसरीकडे, देशाअंतर्गत बाजारात संत्रा विक्रीचे प्रभावी नेटवर्क नसल्यामुळे आगामी हंगामामध्ये संत्र्याचे दर दबावामध्ये राहण्याची व संत्रा उत्पादकांचे आर्थिक नुकसान हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विदर्भामधील एक लाख साठ हजार हेक्टरवरील संत्रा बागा उत्पादनक्षम आहेत.दरवर्षी या बागांपासून किमान ७.५० ते ८ लाख टन संत्र्याचे उत्पादन हाेत आहे , यात सरासरी २.५० ते ३ लाख टन मृग बहाराच्या व ४.५० ते ५ लाख टन अंबिया बहाराच्या संत्र्याचा समावेश आहे . यातील सरासरी २ ते २.५० लाख टन संत्र्याची निर्यात सन २०१९-२० पर्यंत व्हायची. यातील बांगलादेशामध्ये किमान १.७५ लाख टन संत्राची निर्यात व्हायची .

ऑक्टाेबर २०१९ मध्ये केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यातबंदी धाेरणामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशने पहिल्यांदा संत्र्यावर २० टक्के प्रतिकिलाे आयात शुल्क लावले . यात वार्षिक वाढ करण्यात आल्यामुळे सन २०२४ मध्ये हा आयात शुल्क १०१ टका प्रतिकिलाे झाला आहे . बांगलादेशातील सामान्य ग्राहकांना ६० ते ८० टक्के प्रतिकिलाे संत्रा खरेदी करणे परवडते. परंतु आता आयात शुल्कामुळे हा दर १६१ ते १८१ टक्के प्रतिकिलाे हाेणार आहे , हा दर त्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे ते इच्छा असून देखील नागपुरी संत्रा खरेदी करू शकत नाही . संत्र्याची मागणी बांगलादेशमध्ये असून देखील विक्री हाेणार नाही त्यामुळे निर्यात आणखी मंद होणार आहे. याचा संत्र्याच्या किंमतीवर परिणाम हाेणार आहे.

आयात शुल्कमधील वाढ (प्रतिकिलाे)
२०१९-२० :- २० – १४.२९
२०२०-२१ :- ३० – २१.४३
२०२१-२२ :- ५१ – ३६.४३
२०२२-२३ :- ६३ – ४५.००
२०२३-२४ :- ८८ – ६२.८६
२०२४-२५ :- १०१ – ७२.१५

बांगलादेशातील निर्यातीला ब्रेक

सन २०२१-२२ मध्ये नागपुरी संत्र्याचा बांगलादेशातील निर्यातीला ब्रेक लागला. केंद्र व राज्य सरकार ही निर्यात पूर्ववत करण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी तसेच देशाअंतर्गत बाजारामध्ये नागपुरी संत्र्याची माेठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी प्रभावी उपाययाेजना करायला तयार नाहीत. काही व्यापारी याचाच फायदा घेत आहेत . संत्रा विक्रीचे प्रभावी नेटवर्क देशाअंतर्गत बाजारामध्ये नसल्यामुळे शेतकऱ्यांना १५ ते २० रुपये प्रतिकिलाे दराने संत्रा विकावा लागत आहेत , हाच संत्रा ६० ते ८० रुपये प्रतिकिलाे दराने ग्राहकांना खरेदी करावा लागताे.

सरासरी ३० ते ३५ हजार रुपये प्रतिटन भाव नागपुरी संत्र्याला मिळायला हवा. काही शेतकऱ्यांना ४८ हजार रुपये प्रतिटन भाव सन २०२२ मध्ये मिळाला हाेता. संत्र्याचे मध्यंतरी दर ५० ते ६० हजार रुपये प्रतिटनावर गेले हाेते. संत्र्याचे विक्री नेटवर्क आणि याेग्य मार्केटिंग निर्माण केला तर हा दर मिळणे कठीण नाही.
– श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *