
Onion rate : एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातच नाफेड आणि एनसीसीएफतर्फे कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित असताना त्यानंतर दोन महिने उलटून जून उजाडला तरी शेतकऱ्यांना नाफेड कांदा खरेदी करेल किंवा नाही याची शाश्वती वाटत नव्हती. दरम्यान आता मात्र नाफेडकडून शेतकऱ्यांना कांदा खरेदीची दिलासादायक बातमी आहे. काल दिनांक ९ जूनपासून नाफेडच्या संकेतस्थळावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणीची लिंक प्रसिद्ध करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक आणि त्यावरील ओटीपीसह नोंदणी करायची आहे. या लिंकमुळे आता नाफेड कांदा खरेदी केव्हाही सुरू होऊन शेतकऱ्यांना कांदा दर वाढीचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
नाफेडच्या वेबसाईटवर पीएसएस योजनेतून कांदा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी पुढील लिंकवर सुरू करण्यात आली आहे. https://www.epravaha.com/nafed/ या लिंकवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम मोबाईल क्रमांक आणि त्यावर येणाऱ्या ओटीपीवरून नोंदणी करायची आहे. त्यानंतर येणाऱ्या फॉर्मवर आपला आधार कार्ड क्रमांक भरून आणि आधार कार्डचा फोटो अपडेट करून संपूर्ण माहिती, जसे की गाव, तालुका, जिल्हा, सातबारा उतारा, कांद्याचे क्षेत्र इत्यादी जोडून भरायचे आहे. त्यांना जवळचे खरेदी केंद्र कोणते याची माहिती लवकरच त्यावरून सांगितली जाणार आहे.
यंदा नाफेड आणि एनसीसीएफने प्रत्येकी दीड लाख मे. टन म्हणजेच एकूण ३ लाख मे. टन कांदा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले असून त्यातील प्रत्येकी १ लाख २० हजार टन महाराष्ट्रातून आणि उर्वरित गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान व इतर राज्यांतून खरेदी होणार आहे. यंदा विविध कार्यकारी विकास सोसायट्यांना नाफेडने खरेदी कंत्राट दिले असून त्यांची यादी ही थेट दिल्लीतून जाहीर होणार असल्याने त्या प्रक्रियेला उशिर झाल्याचे स्थानिक नाफेडच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान नाफेडच्या नाशिक विभागाचे व्यवस्थापक आर. एम. पटनाईक यांनी कांदा खरेदी ही मे च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल असे संकेत दिले होते. मात्र त्याला अजूनही मुहूर्त न मिळाल्याने ही खरेदी आता या आठवड्या किंवा किमान १५ जूनच्या आसपास सुरू होईल याचे संकेत नाफेडच्या साईटवर दिलेल्या शेतकरी नोंदणी लिंकमुळे मिळत आहेत