Heavy rain : राज्यात अतिवृष्टीचा कहर ,कृषीमंत्र्यांचा तातडीचा आदेश पंचनामे त्वरीत पूर्ण करा…

Heavy rain : राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे ८.७८ लाख हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

नांदेड, यवतमाळ, हिंगोली, परभणी, अकोला, वाशिम, बुलढाणा, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर आणि ठाणे या २२ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये सोयाबीन, बाजरी, मका, सूर्यफूल, भुईमूग यांसारखी पिके पूर्णतः पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

कृषी विभाग आणि महसूल विभागाने संयुक्तपणे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या पथकांनी गावागावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, कोणत्याही योजनेतील निधी परत जाणार नाही याची खात्री करण्याचे आदेशही कृषीमंत्र्यांनी दिले आहेत.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी ‘किसान कॉल सेंटर’ सुरू करण्यात येणार असून, आठ ते दहा दिवसांत पंचनामे पूर्ण करून भरपाईची प्रक्रिया सुरू केली जाईल. पीक विमा योजनेअंतर्गत विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी विमा कंपन्यांशी समन्वय साधण्यात येत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला असून, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मिळावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधावा आणि पंचनाम्यासाठी आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.