
Farm pond scheme : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना संपूर्ण राज्यभर सुरू करण्यात आली आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात मदत करणार आहे.
योजनेचे घटक
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच, वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरितगृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारण्यासाठी अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
वित्तीय तरतुदी
वित्त विभागामार्फत मंजूर
वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंतर्गत वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या ४०० कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सूक्ष्म सिंचनाकरिता ३०० कोटी आणि वैयक्तिक शेततळे घटकासाठी १०० कोटी रुपयांचा समावेश आहे.
अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली
१) वर्ष २०२४-२५ या वर्षात शेततळे घटकासाठी ५२९.५० लक्ष रुपयांचा निधी आयुक्त (कृषी) यांना वितरित करण्यात येणार आहे.
२) लाभार्थ्यांना अनुदान अदागयीची कार्यवाही महा-डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या आधार संलग्न अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा केली जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी लाभ
शासनाच्या विचाराधीन असलेल्या या निधीच्या वितरणामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने योजनेत तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा अधिक सुलभ होतील.
या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि पाण्याच्या योग्य वापरामुळे पाणीबचत होईल. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.