Demand for rice : नवीन वर्ष आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात बासमती तांदळाची मागणी वाढली असून, इराण, इराक व दुबईसारख्या देशांकडून निर्यातीचा वेगही लक्षणीयरीत्या वाढला आहे. गेल्या वर्षीचा जुना साठा जवळपास संपल्यामुळे उपलब्धतेची कमतरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम किमतींवर दिसून येत आहे. परिणामी विविध प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात प्रति क्विंटल सुमारे एक हजार रुपयांची वाढ नोंदवली जात आहे. याच काळात सप्टेंबरमध्ये हरियाना, पंजाबसह मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले; धान भिजल्याने तुकड्यांचे प्रमाण वाढले असून दर्जावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे, ज्यामुळे बाजारातील दबाव अधिक तीव्र झाला आहे.
आंबेमोहोर तांदळाचे भाव यंदा नवीन हंगामाच्या सुरुवातीलाच गगनाला भिडले असून, घाऊक बाजारात दरात २५ ते ३० टक्क्यांहून अधिक वाढ होऊन प्रतिक्विंटल १२,००० ते १४,००० रुपयांपर्यंत व्यवहार सुरू झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून डिसेंबरच्या सुरुवातीलाच या तांदळाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होत असल्याने सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो १२० ते १४० रुपये इतके भाव आहेत. या दरवाढीमुळे आंबेमोहोर महाग झाल्याने ग्राहकांचा कल तुलनेने स्वस्त आणि पारंपारिक बासमती तांदळाच्या खरेदीकडे अधिक वाढताना दिसत आहे.
पूर व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, तांदूळ उत्पादन क्षेत्रात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात काढणीच्या हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली, परिणामी एकूण उत्पादन घटले आणि दर्जेदार तांदळाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले. या परिस्थितीचा थेट परिणाम बाजारावर होत असून सध्या तांदळाचे भाव तेजीत आहेत. त्याचबरोबर आंबेमोहर तांदळाच्या दरात २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा कल तुलनेने परवडणाऱ्या पारंपरिक बासमती तांदळाच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे.












