![](https://krishi24.com/wp-content/uploads/2023/12/हिवाळ्यात-जनावरांचे-आरोग्य-प्रजनन-प्रकृती-खाद्य-चारा-याकडे-लक्ष-द्यावे.webp)
जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये हवामान बदलानुसार बदल करावे लागतात. हिवाळ्यामध्ये जनावरांचे आरोग्य, खाद्य, चारा ,प्रजनन, प्रकृती, याकडे लक्ष द्यावे. लाळ्या खुरकूत, मिल्क फिवर असे जनावरांमध्ये आजार होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हिवाळा ऋतू हा पशुपालनासाठी अत्यंत अनुकूल, पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, भरपूर पाण्याची उपलब्धता,थंडीचा प्रादुर्भाव, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा अनुकूल असतो.
सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतीची जनावरांना गरज असते. पावसाळ्यात वाढीस लागलेली जनावरे ही हिवाळ्यामध्ये असलेले पोषक वातावरण तसेच हिरवा चारा ,वाळलेला चारा, असल्यामुळे धष्टपुष्ट होतात.
हिवाळा ऋतू जरी आरोग्यदायक असला, तरी व्यालेल्या जनावरांची काळजी घेणे आणि लहान वासरांचे थंडीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. गोठ्यामधील उष्णता टिकून राहावी म्हणून जास्त क्षमतेचे बल्ब कमी उंचीवर लावावेत.शक्य झाल्यास गोठ्यामध्ये शेकोटी पेटवावी. लहान वासरांना व गाभण जनावरांना रात्रीच्या वेळी गोठ्यात बसण्याच्या जागी वाळलेले गवत ,कडबा पसरावावा, गोठा कोरडा राहण्यासाठी दर आठ ते दहा दिवसांनी फरशी वर चुना पसरावावा.
गाभण गायी, म्हशींना जास्तीत जास्त ऊर्जा मिळण्यासाठी शेंगदाणा पेंड, सरकी पेंड आहारात यांचा वापर वाढवावा. शक्य असल्यास बायपास फॅट व प्रथिनयुक्त आहार द्यावा. क्षार व जीवनसत्त्वाचे मिश्रण वाढवावे. हिरवा चारा सकाळच्या वेळी व रात्रीच्या वेळी वाळलेला चारा द्यावा. जनावरे चरावयास गोगलगायीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी नेऊ नयेत. जनावरांच्या नाकाभोवती सर्दीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास टर्पेंटाइनचा बोळा फिरवावा.
अतिथंडीमुळे होणारे परिणाम :
जनावरांची थंडीमध्ये शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च होते. म्हणून चाऱ्याची या काळात जास्त गरज असते. जनावरांमध्ये चारा कमी पडल्यास अशक्तपणा दिसून येतो . हिवाळ्यात जनावरांची त्वचा खडबडीत होते. त्वचेला खाज सुटते.
थंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात, तसेच बऱ्याच वेळा पोट गच्च होऊन रवंथ कमी होते. जनावरांच्या सडावर भेगा पडतात त्यामुळे दूध काढताना रक्त येते . जनावरे दूध काढून देत नाहीत तसेच अस्वस्थ होतात, दुधाळ जनावर पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. दुधाच्या प्रतीवर त्याचा परिणाम होतो
करडे आणि वासरे अतिथंडीमुळे गारठतात.
दूध उत्पादनात जनावरे पाणी कमी पिण्यामुळे घट होते. कमी पाणी पिण्यामुळे याचा परिणाम जनावरांच्या पचन संस्थेवर होतो. थंडीमध्ये गोठा लवकर कोरडा होत नाही. त्यामुळे दुर्गंधी वाढते. दुधाळ जनावरांना दुग्धज्वर आजार होण्याची शक्यता वाढते. जनावरांमध्ये आजारांचा प्रादुर्भाव गोठा सततओला राहिल्यामुळे जास्त प्रमाणात होतो.
उपाययोजना :
◼️ उघड्या गोठ्याच्या चारही बाजूंनी, खिडक्यांना पोत्याचे पडदे तयार करून हिवाळ्यात बांधावेत. रात्रभर किंवा जास्त थंडीमध्ये हे पडदे बंद ठेवावेत. दिवसभर ऊन आणि वारा गोठ्यामध्ये खेळता राहण्यासाठी पडदे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत उघडे ठेवावेत.
◼️ जनावरांना एकदम उघड्या गोठ्यामध्ये ठेवू नये किंवा जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये.
◼️ भात किंवा गव्हाचे काड, भुसा वापरून गोठ्यामध्ये जनावरांना बसण्यासाठी गादी तयार करावी. करडांना उबदारपणा मिळण्यासाठी जमिनीवर गव्हाचे काड, भाताचे तूस पसरावे किंवा त्यांना पोत्यावर ठेवावे. शक्यतो दुपारी ऊन असताना गरम-कोमट पाण्याचा वापर करून जनावरांना धुवावे.
◼️ सडाची त्वचा मऊ राहण्यासाठी तसेच भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीन लावावे. सडाला भेगा पडल्यावर लगेच उपचार करावेत. दूध काढण्याच्या वेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
◼️ ऊर्जायुक्त पोषक चारा जास्त प्रमाणात जास्तीच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी उपलब्ध करून द्यावा. जास्त ऊर्जायुक्त खाद्य पदार्थांचा आहारात वापर करावा. संरक्षित स्निग्ध पदार्थांचा आहारात वापर करावा. जेणेकरून जास्तीच्या ऊर्जेची गरज पूर्ण होऊन अपचन टाळता येईल.
◼️अति थंड पिण्याचे पाणीनसावे . हिवाळ्यात पाणी थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पितात . जनावरांनी भरपूर पाणी प्यावे यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे.
◼️अति थंडीमुळे बहुवर्षीय चारा पिकांची वाढ हळूहळू होत असल्यामुळे या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या पिकांची लागवड करावी. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
आजारांचे नियंत्रण
लाळ्या खुरकूत
थंड वातावरणामध्ये आजाराचा प्रसार हा जास्त प्रमाणात होतो. जनावरांच्या तोंडामध्ये, जिभेवर तसेच हिरड्या व खुरामध्ये फोड येऊन ते फुटतात. फुटलेल्या जागी जखमा तयार होतात.
आजारी जनावरांना भरपूर ताप येतो. रवंथ करणे बंद होते. तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळते. श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट येते.
योग्य उपचारानंतर झालेल्या जखमा जरी भरून आल्या तरी विविध व्यंग्य आढळून येतात. जसे की शरीरावर केस जास्त प्रमाणात वाढणे, धाप लागणे, प्रजननक्षमता कमी होणे इत्यादी.
उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय
हा विषाणूजन्य आजार आहे त्यामुळे उपचार नाहीत.
तोंड किंवा खुरामध्ये झालेल्या जखमा दोन टक्के पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने निर्जंतुक कराव्यात. तोंडामध्ये जखम असल्यास ब्लोरो ग्लिसरीन लावावे. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
तीन महिन्यांवरील वासरे आणि जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण वर्षातून दोन वेळा करावे.
मिल्क फिवर :
व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांपर्यंत चांगले दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ जनावरांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
शरीर, दुधासाठी आवश्यक असलेला कॅल्शिअमचा पुरवठा आहारातून न झाल्यास आजार होतो.
लक्षणे
दूध उत्पादन पहिल्या टप्प्यात कमी होते. खाणे पिणे जनावरांचे मंदावते, दुसऱ्या टप्प्यात आजारी जनावर अशक्त होऊन जमिनीवर पोटात मान घालून शांत बसून राहते.
शरीराचे तापमान कमी होते. नाडीचे ठोके वाढतात. श्वसनाचा वेग वाढतो, पोट फुगते. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या व स्थिर होतात.
उपचार
जनावरांना गाभण काळातील शेवटचे दोन महिने व येईल्यानंतरच्या काळात आहारात कॅल्शिअम योग्य मात्रेत द्यावे.
पोट दुखणे किंवा पोट गच्च होणे :
पोट व आतड्यांची हालचाल कमी तापमान असताना जास्त प्रमाणात चारा खाल्ला आणि पाणी पिण्याचे प्रमाण घटले की मंदावते, जनावरांचे पोट गच्च होते.
जनावरांचे खाणे पिणे मंदावते. शेण पडणे घटते, त्यामुळे पोटात दुखते.
उपचार व प्रतिबंधात्मक उपाय
थंडीपासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करावे.गोठ्यातील वातावरण उबदार ठेवावे.
उत्तम खाद्य व चारा दुधाळ जनावरांना द्यावा. पिण्याचे पाणी जास्त थंड असू नये.