karnatak kana bajarbhav : कर्नाटकमधील खरीप कांदा लागवडीत वाढ; महाराष्ट्रात कांदा बाजारभावाचा काय परिणाम..

karnatak kana bajarbhav : कर्नाटक राज्यातील कुर्नुल बाजारात आज शनिवारी ४०० क्विंटल नवीन कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा बाजारभावाचे संकट वाढल्याचे सांगितले जात आहे, मात्र यंदा उन्हाळी कांद्याचे पावसात नुकसान झाल्याने कर्नाटकातील बाजारभाव पडलेले असून एकूणच बाजारभावाबद्दल गोंधळाची स्थिती आहे. त्याचा फायदाही राज्याला होऊ शकतो असे सांगितले जात आहे.

कर्नाटकमध्ये यंदाच्या खरीप हंगामात म्हणजेच २०२५मध्ये कांद्याची लागवड वाढली असली तरी बाजारात सध्या भाव घसरलेले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. विविध जिल्ह्यांतील स्थिती पाहता, अर्ली खरीप कांदा यंदा जास्त क्षेत्रात घेतला जात असून त्याचे उत्पादन येत्या सप्टेंबर–ऑक्टोबरमध्ये बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्याचा अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे जूनमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाल्याने पीक मातीमोल झाले, परिणामी भावही घसरल्याने एकूणच महाराष्ट्रासह अन्य कांदा बाजारावर त्याचे काय परिणाम होतील हे सध्या तरी नक्की नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले
चित्रदुर्ग जिल्ह्यात यंदा खरीप कांद्याची लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली आहे. जून महिन्यात पुरेशा पावसामुळे शेतकऱ्यांनी वेळीच नांगरणी करून बी पेरणी केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अर्ली खरीप कांदा प्रामुख्याने मे–जूनमध्ये लागवड होणारा असून त्याचे उत्पादन ९०–१०० दिवसांनी येते.

अर्ली खरीप कांद्याला चालना
विजयपूर व रायचूर भागातील शेतकरी अर्ली खरीप कांद्याचे उत्पादन घेत आहेत. हे पीक मुख्यत्वे जून महिन्यात लावले जाते. दरम्यान मुदेबिहळ जि. विजयपूर येथील एका शेतकऱ्याने तब्बल पाच ट्रक कांदा स्वतःच्या शेतात फेकून दिला कारण त्याला बाजारात समाधानकारक दर मिळाले नाहीत. यावरून उत्पादन वाढले तरी बाजारभावाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

कांद्याचे बाजारभाव अत्यल्प
सध्या कर्नाटकातील अनेक मंडळांमध्ये कांद्याचे भाव अत्यंत कमी म्हणजेच क्विंटलमागे ४०० ते ७०० रुपयांदरम्यान आहेत. रायचूर जिल्ह्यात आलेल्या कांद्याला पावसाने फटका दिला. वाहतूक खर्च, मजुरी आणि खताच्या दरवाढीमुळे लागवड खर्च वाढला असतानाही बाजारात भाव न मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कांद्याच्या दरात झालेली घसरण ही मागील साठवणूक, मोठ्या उत्पादनाचे आगमन, व स्थानिक व आंतरराज्य बाजारपेठांतील मागणी कमी असणे यामुळे झाली आहे.

महाराष्ट्रावर परिणाम शक्य
कर्नाटकमधील खरीप कांदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात दाखल होऊ लागतो. यंदा लागवड वाढल्यामुळे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे. या कांद्याची विक्री मुख्यतः बेंगळुरू, हैदराबाद, व मुंबई बाजारात होते. त्यामुळे जर कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आला, तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रातील कांद्याच्या भावावर दबाव येऊ शकतो. विशेषतः नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यांमधील उन्हाळी कांद्याच्या शिल्लक साठ्यावर परिणाम होऊ शकतो.

शेतकऱ्यांसाठी पुढील आव्हान
ज्याप्रमाणे चित्रदुर्गसह अन्य भागात लागवडीत वाढ झाली आहे, तशीच उत्पादन वाढण्याची शक्यता असून बाजारपेठ व्यवस्थापन, हमीभाव, तसेच साठवणूक सुविधा या बाबी अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून हस्तक्षेप करून भाव नियंत्रण आणि शेतकऱ्यांना थेट खरेदीचा पर्याय देणे गरजेचे आहे.

कर्नाटकातील अर्ली खरीप कांदा यंदा क्षेत्रफळ व उत्पादनाच्या दृष्टीने सकारात्मक असला, तरी बाजारभावांच्या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. येत्या महिन्यांत महाराष्ट्रातील बाजारपेठांवरही त्याचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी भाव नियंत्रणासाठी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.