हरभरा पिकाचे करा समस्यांनुसार योग्य व्यवस्थापन, वाचा सविस्तर ..

हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वपूर्ण पीक आहे.  हे पीक कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेता येते.  या पिकांच्या अडचणींवर आधारित योग्य नियोजन व व्यवस्थापन केल्यास नुकसानीची पातळी किमान राखता येते.

कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकातील मुख्य समस्या व अडचणी पुढील प्रमाणे आहेत.  या अडचणींचा विचार पेरणीपूर्वीपासून करून त्यावरील उपाय योजना वेळीच अवलंबल्याने भविष्यातील नुकसान कमी होते.

कमी उगवण

कोरडवाहू अथवा बागायती लागवडीमध्ये हरभऱ्याची उगवण कमी होते.  परिणामी झाडांची संख्या कमी राहिल्यामुळे मोठे नुकसान होत असते. कोरडवाहू  परिस्थितीत ट्रॅक्टर द्वारे पेरणी करताना बियाणे कमी जास्त खोलीवर पेरले जातात.  बियाणे उथळ पडल्यास वरच्या थरातील कमी ओलीमुळे अंकुरणात अडचणी येतात.  अर्धवट अंकुरण प्रक्रिया होऊन कमी उगवणीचा धोका संभवते. त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजेच सहा ते आठ सेंटीमीटर राखावी.

ओलिताची व्यवस्था असल्यास स्प्रिंकलरच्या साह्याने संपूर्ण शेत ओलावून घ्यावे.  योग्य प्रकारे वाफसा आल्यानंतर ट्रॅक्टर द्वारे अथवा बैल जोडीने चलित पेरणी यंत्राने पेरणी करावी . शेत तयार केल्यानंतर शेतकरी कोरड्यात हरभऱ्याची पेरणी करतात.  नंतर स्प्रिंकलरच्या  माध्यमातून ओलीत करतात.

अशावेळी कमी अथवा जास्त पाणी दिले गेल्यास दोन्ही पद्धतीत बियाण्यांना बुरशी चढते व कमी उगवणीचा धोका संभवतो.  त्यामुळे योग्य व एकसमान उगवण्यासाठी आधी  ओलित द्यावे.  योग्य प्रकारे वाफसा येऊ द्यावा . त्यानंतर हरभऱ्याची पेरणी करावी पिकांची पूर्ण उगवण झाल्यानंतर पीक रोपटे अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना हलके ओलीत करावे.

म्हणजेच तुषार सिंचन द्वारे पाणी देण्याचा कालावधी दोन ते तीन तासापेक्षा जास्त असू नये.  या द्वारे जमिनीतील राहिलेले बियाणे सुद्धा उगवून येईल.  सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही.  याची काळजी घ्यावी.

उगवण्याच्या वेळी होणारी कतरण

हरभऱ्याचे पीक उगवणीच्या व्यवस्थेत असताना उडद्या कीड/ भुईकिडा /काळी म्हैस यांचा प्रादुर्भाव होतो.  याला शेतकरी  ‘कतरण’ म्हणून संबोधतात. कोरडवाहू हरभरा पिकाचे मोठे  नुकसान दरवर्षी होताना आढळते.  याकरता ज्या शेतामध्ये कतरणची  समस्या दर हंगामात आढळत असलेल्या शेतामध्ये पुढील उपाययोजना कराव्यात.

ओलिताची सोय असल्यास आधी ओलीत करावी.  त्यानंतर वाफसा आल्यावर हरभऱ्याची पेरणी करावी . आधी केलेल्या ओलितामुळे मातीच्या ढेकळाआड  लपलेले किडे ओल्या थराखाली गाडले जातात.  त्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी राहण्यास मदत होते.  पेरणी करताना किंवा शेतात रोटावेटर करण्यापूर्वी दाणेदार क्लोरपायरीफॉस  अथवा कारटॅप हायड्रोक्लोराइड ४ ते ५ किलो प्रति एकर यापैकी एकाचा उपलब्धतेनुसार वापर करावा.

हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर उगवणीपूर्वी साधारणता दोन ते तीन दिवस आधी अथवा पीक रोपटे  अवस्थेत असतानाची सुरुवातीची अवस्था या काळात नॅपसॅक पंपाने क्लोरपायरिफॉस अथवा क्विनॉलफॉस २० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची नोझलला प्लॅस्टिकचे हूड लावून जमिनीलगत दाट फवारणी करावी. याद्वारे उगवणीच्या अवस्थेत कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त शक्य होऊन संभाव्य नुकसान टाळता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *