Rain warning : मॉन्सूनने वेग घेतला, राज्यात जोरदार पावसाचा इशारा…

Rain warning : महाराष्ट्रात मॉन्सूनने आता चांगलाच जोर धरला असून, येत्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात तसेच कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्याच्या भागात मुसळधार सरींची शक्यता असून काही ठिकाणी पूरजन्य स्थिती उद्भवण्याचा धोका नाकारता येत नाही.

ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते, आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच १० जुलैपर्यंत राज्यातील १९ जिल्ह्यांत आणि ठराविक घाटमाथा व आसपासच्या भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः नंदुरबार, कोकणातील संपूर्ण पट्टा आणि विदर्भातील बहुतांश जिल्हे तसेच जळगाव, धुळे, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

या भागांमध्ये शिरपूर, सिंदखेडा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एदलाबाद, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड अशा परिसरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

या पावसामुळे घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या गोदावरी, दारणा, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा, मुठा, कुकडी, कृष्णा-कोयना, पंचगंगा, वारणा, दूधगंगा आणि भोगावती या नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपूर्ण मराठवाडा, अहिल्यानगर जिल्हा आणि पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, जळगाव, धुळे या जिल्ह्यांतील उर्वरित भागांमध्ये आजपासून ८ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. ९ व १० जुलै रोजी याच भागात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

११ जुलैपासून म्हणजेच शुक्रवारपासून राज्याच्या बहुतांश भागात काहीशी उघडीप, मधूनच रिमझिम सरी आणि अधूनमधून सूर्यदर्शन अशा स्वरूपाचे वातावरण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमिनीतील निचरा आणि पीक संरक्षणाच्या उपाययोजना वेळेत राबवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर राहणार आहे. उर्वरित भारतातदेखील उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, पश्चिम बंगाल अशा पूर्वेकडील भागांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाच्या सतत बदलणाऱ्या स्थितीकडे लक्ष ठेवावे आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान विभाग व हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.