Zilla Parishad : पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत सोमवारी (ता. ९) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुपारपर्यंतच्या कलानुसार ७३ पैकी ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत, मुसंडी मारली होती.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या दुर्दैवी घटनेचे सावट निकालावर स्पष्ट दिसून आले. मतमोजणीमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, मावळ, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर, राजगड, भोर, बारामती, इंदापूर या १३ तालुक्यांमध्ये ७३ जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी झालेल्या मतदानाची मोजणी झाली.बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन केला. या विजयाला मात्र उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनाच्या दुःखाची किनार होती.
विजयानंतर अनेक उमेदवार अजित पवार यांच्या आठवणीने गहिवरून गेले होते. इंदापूर, दौंड मध्येही राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र होते.जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या आठ गटांत राष्ट्रवादी काँग्रेस ४, शिवसेना (ठाकरे गट) १ आणि शिवसेना (शिंदे गटाला) ३ ठिकाणी यश आले आहे. तर पंचायत समितीच्या (गणात) १६ पैकी शिवसेना (शिंदे गट) ७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ७, भाजपचा १ आणि शिवसेना (उबाठा) १ उमेदवार विजयी झाला. यामुळे भाजपचा उमेदवार कोणाला पाठिंबा देतो. त्यावर जुन्नर पंचायत समितीचे सभापतिपद अवलंबून राहणार आहे.
आंबेगाव, खेड, शिरूर मध्येही राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे चित्र होते. तर मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) घवघवीत यश मिळवले आहे. यात जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या सर्व १० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी विजयी झाले. या विजयाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी मावळमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र, या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्याने शेळके भावुक झाले होते.पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या चार जागांवर विजय मिळविला. भाजपने जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या दोन जागांवर विजय मिळवीत पुरंदरमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलवले. मागील निवडणुकीत शिवसेनेकडे जिल्हा परिषदेचे तीन आणि पंचायत समितीच्या सहा जागा तर काँग्रेसकडे जिल्हा परिषदेची एक आणि पंचायत समितीच्या दोन जागा होत्या. या निवडणुकीत मात्र शिवसेना सपाटून मार खावा लागला असून पंचायत समितीच्या केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. पंचायत समितीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
बारामती अजित पवारांच्या आठवणींनी गहिवरली
बारामतीमध्ये निकालावर दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींचा गहिवर होता. मतमोजणी केंद्रातून विजयी उमेदवार बाहेर पडत असताना नेहमीचा उत्साह, गुलाल, फटाके किंवा घोषणाबाजी कुठेही दिसली नाही. उलट डोळ्यांत अश्रू, हातात हात, आणि मनात एकच पोकळी अजितदादांची अनुपस्थिती. ‘‘हा विजय आमचा नसून दादांचा आहे,’’ अशी भावना सौ. शामल वाबळे यांच्यासह अनेक विजयी उमेदवारांच्या शब्दांतून उमटत होती. दिवंगत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आजवर पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेला सर्वांगीण विकास आजच्या मतमोजणी निकालातून स्पष्ट होत आहे, दादांच्या प्रति समर्पित केलेले हे प्रचंड मतांचे आकडे पुढे येत आहेत, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.












