
corn prices : यंदा देशातील मका उत्पादनात घट झाल्यामुळे जुलै महिन्यात मक्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सन २०२४-२५ या हंगामात भारतातील मका उत्पादनात सुमारे ६ टक्क्यांची घट झाली आहे. विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान यांसारख्या प्रमुख मकाउत्पादक राज्यांमध्ये यंदा पेरणी कमी झाली असून, पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थितीही काहीशी तशीच आहे. अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे मक्याचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे. त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होऊन कच्च्या मक्याच्या दरात वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतातील विविध बाजार समित्यांमधील दरांचा मागील तीन वर्षांतील अभ्यास करता, जुलै महिन्यात सरासरी बाजारभाव २२५० ते २४०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सन २०२४-२५ साठी मक्याचा किमान आधारभूत दर (एमएसपी) २२४५ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारभाव हा एमएसपीच्या वर राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मक्याचा उपयोग मुख्यत्वे पोल्ट्री फीड, स्टार्च उत्पादन आणि औद्योगिक प्रक्रिया यामध्ये होतो. मागणी स्थिर असून साठा कमी असल्यामुळे दरवाढीचा कल कायम राहू शकतो. पोल्ट्री उद्योगातील वाढलेली मागणी आणि निर्यातीस चालना मिळाल्यास मक्याचे दर आणखी वाढू शकतात.
शेतकऱ्यांनी अशा स्थितीत त्यांच्या मालाची गुणवत्ता सुधारून प्रतवारीनंतर विक्री करावी. उच्च प्रतीच्या मक्याला चांगला दर मिळण्याची शक्यता अधिक आहे. बाजारात रोज बदलणाऱ्या दरांवर लक्ष ठेवून विक्री करावी. ज्या भागात खाजगी व्यापाऱ्यांकडून अधिक दर मिळत आहेत, तिथे थेट व्यवहार करण्याचा विचार करता येईल.