Gram price : हरभऱ्याच्या दरात स्थैर्य, पण एमएसपीपेक्षा खाली राहण्याची शक्यता..

Gram price : हरभरा हे भारतातील प्रमुख रब्बी पीक असून, यंदा देशात हरभऱ्याचे उत्पादन तुलनेत जास्त झाले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांमध्ये हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या अहवालानुसार सध्याच्या स्थितीत देशात पुरेसा साठा असून त्याचा परिणाम दरांवर होत आहे.

सरकारकडून अन्नसुरक्षा योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करण्यात आली असली तरीही बाजारात हरभऱ्याची नियमित आवक सुरूच आहे. मागणी तुलनेत पुरवठा अधिक असल्यामुळे दरावर दबाव आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात दर ६७०० रुपयांपर्यंत गेले होते, मात्र यंदा जुलै २०२५ मध्ये दर ५ हजार ५० ते ५७०० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सध्याचा एमएसपी ६३०० रुपये आहे. त्यामुळे अनेक बाजारांमध्ये दर हा एमएसपीच्या जवळपास अथवा काहीसे खाली राहण्याची शक्यता आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हरभऱ्याचा दर स्थिर असल्यामुळे निर्यातीस फारसे आकर्षण नाही.

हरभऱ्याची मागणी मुख्यतः डाळ उद्योगातून येते. भारतात हरभऱ्यापासून बेसन व चणाडाळ मोठ्या प्रमाणात बनवली जाते. सणासुदीच्या काळात या वस्तूंची मागणी वाढते, मात्र जुलैमध्ये ही मागणी तुलनेने कमी राहते. त्यामुळे दर स्थिर राहण्याची शक्यता अधिक आहे.

शेतकऱ्यांनी अशा बाजारस्थितीत लगेचच सगळा साठा विकून न टाकता दर सुधारण्याची वाट पाहावी. सरकारच्या नाफेड किंवा स्थानिक समित्यांमार्फत खरेदी सुरू असल्यास, त्याचा लाभ घ्यावा. साठवणूक योग्य पद्धतीने केल्यास २-३ महिने दर चांगले येण्याची शक्यता असते.