Onion producers : कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक आणि आशादायी ठरला असून, प्रशासकीय प्रक्रियेमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
सात-बारा उताऱ्यावरील आवश्यक नोंदी नसल्याच्या कारणामुळे शासनाच्या कांदा अनुदान योजनेतून वंचित राहिलेल्या २१० शेतकऱ्यांना दीर्घ पाठपुराव्यानंतर एकूण ५२ लाख ७१ हजार ६४४ रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सन २०२२–२३ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील १,४०७ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले होते, त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा समावेश होता. शासन निर्णयानुसार १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खासगी बाजारांमध्ये कांदा विक्री केली असतानाही केवळ तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले होते.
या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सातत्याने निवेदने व पाठपुरावा करण्यात आला. अखेर जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या पत्रानुसार फेरछाननी करून अंतिम पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याचे आदेश दिले, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली.












