
राज्यात मागील दोन दिवसांपासून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांच्या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. येत्या १२ मे पर्यंत अवकाळीची शक्यता असून गारपीटीचा धोका मात्र आज गुरुवार दिनांक ८ मे पासून कमी होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सध्या दुपारच्या उन्हाच्या तापमानात आणि रात्रीच्या उकाड्यात लक्षणीय घट झाली आहे. अवकाळीच्या वातावरणामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा २ ते ४ अंश सेल्सियसने घट झाली असून, रात्रीच्या किमान तापमानातही २ ते ६ अंशांनी घट झाल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
गारपीटीबाबत माणिकराव खुळे यांनी सांगितले की, छत्तीसगडवरील आणि अरबी समुद्रातील वेगवेगळ्या चक्रीय वाऱ्यांच्या संगमामुळे राज्यभर गारपिटीची शक्यता निर्माण झाली आहे. या हवामान प्रणालीमुळे अवकाळी पावसाची तीव्रता वाढली असून, पुढील काही दिवसांत गारपिटीचा धोका कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, ८ मेपासून गारपीटीचा धोका कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यांच्या अंदाजानुसार, कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा प्रभाव ११ मेपर्यंत टिकू शकतो. त्याचबरोबर, पुढील दोन दिवसांत राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
माणिकराव खुळे हे हवामान विभागाचे निवृत्त प्रमुख असून ते सातत्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना हवामानविषयी माहिती देत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात १२ मेपर्यंत तापमानाची सद्यस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दुपारच्या उन्हात आणि रात्रीच्या उकाड्यात आराम मिळेल.