Urea scam : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत शहरासह आसपासच्या भागात युरिया खताच्या विक्रीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून केला जात आहे. शासनाने युरियाची अधिकृत किंमत २६६ रुपये निश्चित केली असतानाही काही खत व कृषी औषध विक्रेते प्रति गोणी ३०० रुपये किंवा त्याहून अधिक दर आकारत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून दरनियंत्रणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
संबंधित विक्रेत्यांकडून युरियाच्या दरवाढीचे कारण ट्रान्सपोर्ट व हमाली शुल्क असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप केला जात आहे. युरिया खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना नॅनो युरिया किंवा इतर खते व कृषी औषधे बळजबरीने घेण्यास भाग पाडले जात असून, “युरियाला लिंकिंग आहे” असे सांगत प्रत्येकी २३० रुपये दराने नॅनो युरिया विकला जात आहे. नॅनो युरिया घेणे बंधनकारक नसतानाही अशी सक्ती केली जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एक किंवा चार गोण्या युरिया खरेदी करताना प्रत्यक्षात एक ते दोन नॅनो युरिया बाटल्यांचीच आवश्यकता असते; मात्र काही विक्रेते चार बाटल्या किंवा अनावश्यक कृषी औषधे जबरदस्तीने देत असल्याचा आरोप होत आहे. याला विरोध केल्यास “युरिया शिल्लक नाही” असे सांगून थेट विक्री नाकारली जात असल्याने शेतकरी हतबल होत आहेत. या सक्तीमुळे एका युरिया गोणीसाठी तब्बल ५३० रुपये मोजावे लागत असून, हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची उघड लूट असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तसेच काही विक्रेते मुद्दाम रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण करत असल्याचाही आरोप आहे. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने मका, गहू, ज्वारी, बाजरी तसेच इतर पिकांसाठी युरिया अत्यंत आवश्यक आहे. पिकांची वाढ, गुणवत्ता आणि उत्पादन वाढवण्यासाठी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणावर असताना सुरू असलेले हे गैरप्रकार शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढवत आहेत.
पिंपळगाव बसवंत हे ‘मिनी दुबई’ म्हणून ओळखले जाणारे आणि परिसरातील शेकडो गावांसाठी महत्त्वाची कृषी बाजारपेठ असलेले केंद्र आहे; मात्र याच ठिकाणी रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, दोषी विक्रेत्यांवर तात्काळ व कठोर कारवाई करून हा गैरप्रकार थांबवावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
“युरिया २६६ रुपयांना मिळायला हवा; मात्र आम्हाला ३०० रुपये मोजावे लागतात. त्यासोबत इतर औषधेही बळजबरीने घ्यायला लावली जातात, आणि याविरोधात आवाज उठवला तर युरिया देण्यास नकार दिला जातो,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी स्वप्निल निरगुडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत तालुका कृषी निरीक्षक राहुल धनगर यांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, युरिया विक्रीत दरवाढ, लिंकिंग किंवा बळजबरीने अन्य खते व औषधे विकली जात असल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
युरिया खताच्या विक्रीत सुरू असलेले गैरप्रकार हे खत अनुदान धोरणातील त्रुटींचे परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारकडून खत अनुदानावर दरवर्षी सुमारे २.४ लाख कोटी रुपयांचा खर्च केला जातो, मात्र युरिया अत्यंत स्वस्त असल्याने त्याचा अतिवापर होतो आणि परिणामी नायट्रोजनचे प्रमाण वाढून फॉस्फरस व पोटॅश खतांचा वापर घटतो. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. विशेषतः आर्थिक अडचणींमुळे उधारीवर खते व औषधे घेणाऱ्या शेतकऱ्यांची कोंडी होत असून, विरोध करण्याची क्षमता नसल्याने दुकानदार देतील तीच खते व औषधे घ्यावी लागतात. नको असलेली औषधे, नॅनो युरिया किंवा अतिरिक्त खते घेण्यास भाग पाडले जात असल्याने आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक कर्जाच्या गर्तेत अडकत आहे. या सर्व गैरप्रकारांमुळे शेती करणे अधिक अवघड होत असून, आर्थिक शोषणाला सर्वाधिक बळी उधारीवरील शेतकरी ठरत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे.












