सरकारने सोयाबीनच्या आयात शुल्कामध्ये वाढ केल्यामुळे २५० ते ३०० रुपयांनी प्रतिक्विंटल सोयाबीनच्या दारात वाढ झाली आहे. यंदा खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन पुढील १५ दिवसांनी बाजारात येईल. शेतकऱ्यांच्या भाववाढीमुळे अपेक्षा वाढल्या आहेत.
सोयाबीन हे खामगाव जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. खामगाव जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी एकूण क्षेत्रफळाच्या ५० टक्के क्षेत्रफळावर केली आहे. यावर्षी सरासरीच्या १११ टक्के क्षेत्रावर ४ लाख ४० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सोयाबीनचे दर गेल्या वर्षी ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल होते.त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले .
यावर्षी सोयाबीन पिकाचे अनेक भागात जास्त पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनामध्ये घट येणार आहे. पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत सोयाबीनचे दर कमी होते. परंतु , आता प्रतिक्विंटल३०० रुपयांनी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे.
यावर्षीचे सोयाबीन १५ दिवसांनी बाजारात येणार आहे. त्यामुळे अजून दरामध्ये वाढ होणार का , की शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येताच भाव पडतील, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी मूल्य आयोगाने शेतकऱ्याचे मत घेऊन हमीभाव ठरवायला पाहिजे . त्यांनी प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांना उत्पादन किती होते, याची पाहणी करायला पाहिजे .सरकारने सोयाबीनला ८ ते ९ हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव द्यायला पाहिजे .
प्रशांत डिक्कर, विदर्भ अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
तसेच शेतकऱ्यांना एकरी ४७ क्विंटल सोयाबीन पिकवणारे तंत्रज्ञान वापरण्याची जगामध्ये परवानगी आहे. आपल्याकडील शेतकऱ्यांना ते तंत्रज्ञान वापरू द्यावे आणि शेतकऱ्यांसाठी जगाची बाजारपेठ खुली करून द्यावी . आपल्याकडे मुबलक सूर्यप्रकाश, काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, हे जगाच्या तुलनेत चांगले आहे . भारतीय शेतकरी त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकतात.
– देवीदास कणखर, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना
मागील वर्षीचे सोयाबीन घरातच पडून..
सोयाबीनचा भाव मागील वर्षी कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही . त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून आहे. यामुळे यावर्षी पुन्हा बाजारात जास्त प्रमाणात सोयाबीन येणार आहे.सोयाबीनचा भाव यावर्षी जर वाढला नाही तर शेतकऱ्यांना दोन्ही वर्षाचे नुकसान सहन करावे लागेल.
दहा दिवसांत वाढला भाव…
५ सप्टेंबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचा दर ३ हजार ३७५ ते ४ हजार ४०० रुपये होता, तर १४ सप्टेंबर रोजी यामध्ये वाढ होऊन ४ हजार ते ४ हजार ६०० रुपये भाव मिळाला. २०० रुपयांनी भाववाढ दहा दिवसांत झाली आहे.
१११ टक्के पेरणी..
कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा सोयाबीनची यावर्षी १११ टक्के पेरणी केली आहे.यंदा ४ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन सोयाबीनवर अवलंबून असते.