
*Nafed Kanda Kharedi : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील कांदा बाजारात भाव कोसळले असून मागच्या दोन आठवड्यापूर्वी तर १ हजाराच्या खाली गेले होते. मात्र दहा दिवसांपासून त्यात दोन ते तीन रुपयांची सुधारणा होऊन ते पुन्हा सरासरी १ हजार (राज्याची सरासरी) रुपये प्रति क्विंटलपर्यंत आले आहेत.
अशातच मागील पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने कांदा पिकासह अनेक पिकांचे नुकसान केले असून अनेकांचा कांदा काढणीच्या आधीच शेतात सडला आहे, तर काहींचा कांदा चाळीत जाण्यासाठी सुकविण्यासाठी वेळच मिळाला नाही. तोही ओला झाल्याने चाळीत कांदा पडला नाही. परिणामी शेतकरी सर्वच बाजूंनी अडचणीत सापडला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना नाफेड आणि एनसीसीएफच्या सरकारी कांदा खरेदीची प्रतिक्षा आहे. आता ही प्रतीक्षा संपणार असून सोमवार दिनांक २६ मे पासून किंवा सोमवारपर्यंतच्या आठवड्यात ही खरेदी सुरू होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात कृषी २४ ने या पूर्वीच नाफेडचे नाशिक शाखेचे व्यवस्थापक श्री. पटनाईक यांच्याशी संपर्क केला होता. त्यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ही खरेदी १५ मे च्या आधीच होणे अपेक्षित होती. मात्र निविदांमधील घोळ कायम राहिल्याने ही खरेदी लांबल्याचे काही फेडरेशन आणि निविदा प्रक्रियेतील सहभागी सहकारी सोसायट्या यांच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. आता याच प्रतिनिधींनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर नाफेडची खरेदी सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे. अर्थात त्यात काही बदलही होऊ शकतो अशीही शक्यता असली, तरी आता आठ ते दहा दिवसात नाफेडची खरेदी सुरू होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान यंदा नाफेड आणि एनसीसीएफ या दोघा संस्थांमार्फत देशात उन्हाळी कांद्याची प्रत्येकी दीड लाख मे. टन प्रमाणे एकूण ३ लाख मे. टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नाफेडच्या खरेदीतील दीड लाख टनांच्या उदिष्टांपैकी १ लाख टन एकट्या नाशिक जिल्ह्यातून, कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशमधून प्रत्येकी ५ हजार मे.टन आणि उर्वरित ३५ हजार मे. टन कांदा खरेदी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जळगाव-धुळे या जिल्ह्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांतून होणार आहे. एनसीसीएफच्या कांदा खरेदीचे साधारण अशाच प्रकारचे खरेदीचे नियोजन असेल.
यंदाची खरेदी ही पीएसएफ अर्थातच मूल्य स्थिरीकरण फंड यातून होणार असल्याने ती बाजारभावाप्रमाणे (पिंपळगाव आणि लासलागाव बाजारसमित्यांचे जास्तीत जास्त बाजारभावांची सरासरी) प्रमाणे होण्याची शक्यता नाफेडच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदाच्या खरेदीत अधिक पारदर्शकता येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. नाफेडची खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारात दर वाढण्याची शक्यता असून किलोमागे २ ते ५ रुपये दर वधारतील अशी शक्यता बोलून दाखविली जात आहे.