
Nag Panchami : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरी होणारी नागपंचमी ही राज्यातील एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. या भागात नाग, धामण, घोणस यांसारख्या जिवंत सर्पांना पकडून त्यांची स्नान, पूजन व मिरवणुकीत प्रदर्शन करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. स्थानिकांनी या सर्पांना घरातच पाळून त्यांचे जतन केल्याचे अनेक दाखले आहेत. विशेष म्हणजे हे सण पारंपरिक कुटुंबांमध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात आणि नागपंचमीनंतर हे सर्प पुन्हा जंगलात सोडले जातात.
मात्र १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्प पकडणे, त्यांना बंदिवासात ठेवणे किंवा त्यांच्यावर पूजाविधी करणे ही गोष्ट कायद्याने प्रतिबंधित आहे. यामुळे 2003 आणि 2014 मध्ये उच्च न्यायालयांनी आदेश देत या परंपरेवर निर्बंध घातले. त्यानुसार राज्य शासनाने 2015 मध्ये एक कृती आराखडा तयार केला आणि त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली. नागपंचमीच्या काळात वनविभाग, पोलिस, प्राणीमित्र आणि स्थानिक संस्था मिळून जनजागृती करतात आणि सर्प वापराविरुद्ध कारवाईही केली जाते.
याच पार्श्वभूमीवर, शिराळा येथील नागपंचमी परंपरेविषयी स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या वादाला तोडगा काढावा, अशी मागणी राज्य विधानसभेत करण्यात आली. सदस्य सत्यजित देशमुख यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर जयंत पाटील, अर्जुन खोतकर आणि गोपीचंद पडळकर यांनीही चर्चा केली.
या चर्चेला उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, पारंपरिक सण व श्रद्धा जपताना वन्यजीव कायद्यातील तरतुदींचाही विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे या विषयावर केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
या बैठकीत कायद्याच्या चौकटीत राहून शिराळा येथील नागपंचमीची पारंपरिक साजरीकरण परत सुरु ठेवता येईल का, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या तरी या परंपरेबाबत कायद्याचा आदर राखत चर्चा आणि सल्लामसलत सुरू राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.