श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाची लागवड (Cultivation Watermelon) करत चांगलं उत्पन्न घेतलंय. हे कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला आहे.
आरोही, विशाला आणि सरस्वती वाणाच्या कलिंगडाची लागवड
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पारंपरिक शेती न करता पिवळ्या रंगांच्या कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या दीड एकर शेतात पिवळ्या कलिंगडाची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. त्यामुळं त्यांना शाश्वत भाव देखील मिळाला आहे. संजय रोडे यांनी आपल्या दीड एकर शेतात आरोही, विशाला आणि सरस्वती या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली आहे. दीड एकरात त्यांनी 12 हजार रोपे लावली आहेत. यासाठी त्यांना 70 ते 75 हजारांचा खर्च आला आहे.
कलिंगडांना शहरी भागात मोठी मागणी
सरस्वती हे आकाराने गोल कलिंगड आहे. त्याची साल ही गडद हिरव्या रंगाची असून हे कलिंगड आतून गडद लाल रंगाचे निघते. तर विशाला वाणाचे कलिंगड बाहेरुन पिवळ्या रंगाचे असून आतून ते लाला रंगाचे निघते.आरोही वाणाचे कलिंगड हे बाहेरुन हिरव्या रंगाचे असून ते आतून पिवळ्या रंगाचे निघते. दिसायला वेगळेपण असल्यानं या कलिंगडांना शहरी भागात अधिक मागणी असते.
कलिंगडाची लागवड केल्यास पारंपरिक पिकापेक्षा अधिक फायदा
संजय रोडे यांनी वेगळ्या कलिंगडाची लागवड केल्यास त्यांना पारंपरिक पिकापेक्षा अधिक फायदा होऊ शकतो असा सल्ला परिसरातीलच कृषी सेवा केंद्र चालक शैलेश ढवळे यांनी दिला. सोबतच लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यांनीच संजय रोडे यांना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे या कलिंगडावर खूप कमी प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करावा लागत असल्याचे शैलेश ढवळे यांनी सांगितलं.
बाजारभावापेक्षा जागेवरच अधिक भाव
संजय रोडे यांनी एका खासगी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केल्यानं उत्पादित केलेला माल या बाजारात घेऊन जाण्याची गरज भासत नाही. बाजारभावापेक्षा जागेवरच अधिक भाव मिळत असल्यानं त्यांना अधिकचा नफा मिळणार आहे. संजय रोडे यांना 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक पिकांना फाटा देऊन योग्य नियोजन करुन संजय रोडे यांनी पिवळ्या कलिंगडाचे उत्पादन घेऊन चांगलं उत्पन्न देखील मिळवलं असल्याने त्यांचं परिसरातून कौतुक होत आहे.
source:- abplive