पुणे : राज्यात जमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद थांबावेत, यासाठी भूमिअभिलेख विभागातर्फे मोजणी नकाशालाच अक्षांश व रेखांशाची जोड देण्यात येणार असून, पुणे जिल्ह्यात मुळशी येथे 15 एप्रिलपासून हे काम सुरू करण्यात येणार आहे. देशासह राज्यातील पहिला प्रयोग वाशिम जिल्ह्यातील गुंज गावात करण्यात आला. तेथे अशा पद्धतीचा पहिला नकाशा देण्यात आला आहे.
जमीन मोजणीसाठी आता राज्यभर रोव्हर यंत्राची मदत घेण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. यामुळे सरकारी कार्यालयातील हेलपाटेही त्यामुळे वाचणार आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 69 रोव्हर यंत्रे दाखल झाली असून, मुळशीत 15 एप्रिलपासून रोव्हर यंत्रांव्दारे काम सुरू होणार आहे. वाशिम जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर रोव्हर यंत्रणेनेद्वारे मोजणी नकाशालाच अक्षांश व रेखांशाची जोड देण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिलपासून या पद्धतीने मोजणी सुरू झाली आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील प्रत्येकी एका तालुक्यात 15 एप्रिलपासून मोजणीचे काम रोव्हर यंत्राद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी 902 रोव्हर यंत्रे राज्याला मिळाली आहेत. त्यातील 500 यंत्रांची खरेदी नुकतीच करण्यात आली आहे, तर 400 यंत्रे जिल्हा नियोजन समितीमार्फत खरेदी केली जाणार आहेत. रोव्हर यंत्राद्वारे होणार्या मोजणीनंतर सुरू केलेल्या संगणकीकृत प्रणालीची चाचणी सध्या सुरू आहे.
राज्याला अजून 700 ते 800 रोव्हरची गरज असून, पुढील काही दिवसांत 600 रोव्हर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. रोव्हर यंत्रांचे वाटप करताना ज्या जिल्ह्यांत मोजणीची प्रकरणे जास्त आहेत, त्या जिल्ह्यांना जास्त रोव्हर देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्याला सर्वाधिक 69 यंत्रे देण्यात आली आहेत, तर हिंगोली व धुळ्यात सर्वांत कमी अर्थात 10 रोव्हर यंत्रे देण्यात आली आहेत.
🔹रोव्हर यंत्रे व संगणक प्रणालीचा फायदा : रोव्हर यंत्रामुळे जमीन मोजणी लवकर होईल. प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने फाईल तयार करणे, माहितीचे पृथक्करण करणे, ‘क’ प्रत तयार करणे, ते संबंधिताला देणे, यात किमान चार ते पाच दिवसांचा वेळ लागतो. ही प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने त्यात वेळ जाणार नाही. सेवा हमी कायद्यानुसार सेवा देण्यात आणखी मदत होईल.
🔹रोव्हरद्वारे मिळालेल्या नकाशाचे वैशिष्ट्य : या नकाशाची अचूकता 15 सेंटिमीटरची आहे. पूर्वी देण्यात येणार्या नकाशाची वैधता केवळ सहा महिने ते एका वर्षाची असायची. मात्र, या ऑनलाइन नकाशाची वैधता आता मात्र अक्षांश-रेखांश मिळाल्यानंतर कायमस्वरूपी राहणार आहे.
source : pudhari